कोरची तालुक्यातील दोन शिक्षिका निलंबित तर एका शिक्षिकेचे दोन इन्क्रिमेंट थांबविले


- शाळेत नियमित न जाणे भोवले

- अखेर नारकसा व बोटेझरीच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची :
तालुक्यातील बोटेझरी व नारकसा या गावातील जिल्हा परिषद शाळेळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे  24 ऑगस्टला निदर्शनास आले. कारण बोटेझरी येथे कार्यरत असलेल्या दोन्ही शिक्षिका शाळेत न जाता तेथे शिकवायला एका दहावीच्या विद्यार्थ्यांना 2500 रुपये मासिक रक्कम देत होते व नारकसा येथील शिक्षिका शिकवायला येत नसल्या कारणाने तेथील पालकांनी आपल्या तीन पाल्यांना ग्यारापत्ती येथील आश्रमशाळेत दाखल केले. अशा गंभीर बाबीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली होती व या बाबीची बातमी सुद्धा प्रकाशित करण्यात आली होती. जर शिक्षण विभागामध्ये असा भोंगळ कारभार सुरू असेल तर मग आपण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची अपेक्षा कुणाकडे ठेवायची? असा मोठा प्रश्न लोकांच्या मनात उध्दभवत आहे. शासनाकडून शिक्षणाकरिता राबवण्यात येणारी विविध योजना व उपक्रमाचे काहीही उपयोग होत नसल्याचे चित्र नारकसा व बोटेझरी येथे दिसून आले. तर मग शासनाचा पैसा घरी बसून लाटण्याकरिता आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून बोटेझरी येथील स्मिता मस्के व वनमाला खोब्रागडे यांना निलंबित करण्याचे व नारकसा येथील धनश्री मिसार यांचे दोन इन्क्रिमेंट थांबवण्याचे आदेश पंचायत समिती कोरची येथे पाठविण्यात आले. स्मिता मस्के यांना पंचायत समिती वडसा मुख्यालय तर वनमाला खोब्रागडे या शिक्षिकेला कुरखेडा पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे. आतातरी शिक्षकांनी वेळेवर येऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे कार्य व्यवस्थितरित्या पार पाडावे जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होता कामा नये.
बोटेझरी येथील दोन्ही शिक्षिका सत्र 2019-20 मध्ये नियुक्तीस्थळी कर्तव्यावर सतत गैरहजर राहणे, महिन्यातून एक-दोन दिवस उपस्थित राहून हजेरीपटावर संपूर्ण महिन्याची उपस्थिती दर्शवून संपूर्ण महिन्याचे वेतन उचलणे आणि स्वतःच्या जागी गावातील सुशिक्षित युवकाला मानधन देऊन अध्यापन कार्य सोपवणे व खोटे दस्तऐवज तयार करून प्रशासनाची दिशाभूल करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे. वरील सर्व गंभीर बाब असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या असल्या कारणाने श्रीमती स्मिता मस्के व श्रीमती वनमाला खोब्रागडे यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्‍त व अपील) नियम 1964 मधील नियम 3 (1) अ नुसार त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. तसेच नारकसा येथील धनश्री मिसार यांनी शैक्षणिक वर्ष 2018-19 व 2019-20 या सत्रात दरमहा फक्त दोन-तीन दिवस उपस्थित राहून बाकीचे दिवस सतत गैरहजर राहून मुलांचे शैक्षणिक नुकसान केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियम 3 चा भंग केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्‍त व अपील) नियम 1964 मधील नियम 4 (2) नुसार 2 वार्षिक वेतन वाढ तात्पुरत्या स्वरूपात पुढील वेतनवाढीवर परिणामकारक न ठेवता रोखण्यात आले आहे. या कारवाईमुळे कामचुकार व शाळेत सतत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-17


Related Photos