फोकुर्डी - नवेगाव मार्गावर दारूसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त


- गडचिरोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुने फोकुर्डी ते नवेगाव मार्गावर आज, 16 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास सापळा रचून दारूसह 6 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सोमेश्वर बालाजी गोहणे (45) रा. फोकुर्डी यास अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या व दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्हा दारूबंदी म्हणून घोषित केला असतानाही जिल्हयात अवैधरित्या दारूची चोरटी आयात करुन मोठया प्रमाणावर दारूविक्री होत असल्याने अवैधरित्या सुरु असलेल्या दारु वाहतूक व विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक 15 नोव्हेंबर 2019 रोजी गडचिरोली शहरात गस्तीवर असताना सीमावर्ती चंद्रपूर जिल्हयातील तसेच चामोर्शी येथील काही ठोक दारु पुरवठदार हे चारचाकी वाहनाने दारुची बेकायदेशीररित्या वाहतूक करुन दारुविक्री संबंधात फोकुर्डी येथील अवैध दारुविक्रेता सोमेश्वर गोहणे याच्यासोबत संगणमत करुन त्याच्या माध्यमातून चामोर्शी तालुक्यातील चिल्लर दारु विक्रेत्यांना घरपोच पुरवठा करण्यासाठी दारुचा साठा त्याच्या घरी साठवणूक केल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीवरुन 15 नोव्हेंबरला 2019 रोजी अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग, पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस पथकाने फोकुर्डी ते नवेगाव मार्गावर सापळा रचला. दरम्यान, आज 16 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास सोमेश्वर गोहणे हा आपल्या ताब्यातील स्कूटरवर (क्र. एमएच 33 यु 2020) एका प्लाॅस्टिकच्या चुंगळीमध्ये 24 हजार रुपये किंमतीचे देशी दारुचे 3 बाॅक्स मांडून चिल्लर दारुविक्रेत्यांना घरपोच नेवून देताना आढळला. त्यानंतर गोहणे याच्या फोकुर्डी ते नवेगाव मार्गावर बांधकाम सुरु असलेल्या नवीन इमारतीची झडती घेतली असता, तिथे 5 लाख 76 हजार रुपये किंमतीच्या 72 सुपर साॅनिक राॅकेट संत्रा कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या एकूण 7 हजार 500 सिलबंद निपा आढळून आल्या. तसेच बेकायदेशीर दारु वाहतुकीकरिता वापरण्यात आलेली स्कूटर असा एकूण 6 लाख 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाा. यावेळी आरोपी सोमेश्वर बालाजी गोहणे रा. फोकुर्डी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली याच्याविरुदध पोलिस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-16


Related Photos