१ लाखाची लाच घेताना नगर भूमापन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळयात


- लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
वडिलोपार्जित प्लाॅट सर्व्हे क्रमांक 114 बापूनगर नागपूरमध्ये समाविष्ट करण्याच्या कामाकरिता 1 लाख रुपयाची लाच घेताना भूमिअभिलेख विभगातील नगर भूमापन अधिकारी आश्रय मधुकर जोशी 40 सर्व्हेअर, सिद्धी सर्व्हे भूमापन कार्यालय क्रमांक 2 नागपूर यास लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या अधिकाऱ्यांनी आज, 14 नोव्हेंबर 2019 रोजी रंगेहाथ अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे भांडे प्लाॅट चैक, उमरेड रोड नागपूर येथील रहिवासी आहे. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित प्लाॅट नं. 114 बापूनगर, नागपूर येथेील क्षेत्रफळ 2693.47 स्केअर फूट असून त्यामध्ये 894.47 जागेबदल न्यायालयात वाद सुरु होता. सदर खटल्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजुने लागल्याने वाढीव जागेकरिता पैशाची देवाणघेवाण सन 1990 ला बापूनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेकड झालेली आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तक्रारदाराने 894.47 स्केअर फूट जागा त्यांचे वडिलोपार्जित प्लाॅट नं 114 बापूनगर नागपूरमध्ये समाविष्ट करण्याकरिता नगर भूमापन अधिकारी क्रमांक 2 नागपूर या कार्यालयात रितसर अर्ज केला होेता. सदर अर्जाबाबत काय कारवाई झाली त्याबाबत तक्रारदार हे सर्व्हेअर आश्रय मधुकर जोशी यांना भेटले असता त्यांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 894.47 स्केअर फूट जागा तक्रारदाराच्या वडिलोपार्जित प्लाॅट नं 114 बापूनगर, नागपूरमध्ये समाविष्ट करण्याकरिता तक्रारदारास 1 लाख रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदाराची सर्व्हेअर आश्रय जोशी यास लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली.
या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथील पोलिस निरीक्षक पंकज उकडे यांनी गोपनीयरित्या शहानिशा करुन भूमिअभिलेख विभागातील कर्मचाश्रयाविरुद्ध सापळा रचला. दरम्यान, लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने 8 नोव्हेंबर 2019 रोजी क्रिकेट ग्राउंड सक्करदरा, नागपूर येथे सापळा रचला असता संशय आल्याने आश्रय जोशी हा लाच रक्कम न स्वीकारता पळून गेले. त्यानंतर आश्रय जोशी सापडल्याने आज, 14 नोव्हेंबर रोजी त्याच्याविरुद्ध पोलिस स्टेशन सक्करदरा, नागपूर शहर येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. भूमिअभिलेख विभागातील सर्व्हेअर आश्रय जोशी याच्या नागपूर येथील निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूद्वारे झडती सुरु आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर व अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुददलवार, पोलिस उपअधीक्षक मिलिंद तोंतरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक पंकज उंकडे, पोलिस हवालदार अशोक बैस, नाईक पोलिस शिपाई प्रभाकर बले, मंगेश कळंबे, चालक पोलिस शिपाई वकील शेख यांनी केलेली आहे. या कारवाईमुळे भूमिअभिलेख विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-11-14


Related Photos