बिरसा मुंडा युवकांसाठी प्रेरणास्थान


आयुष्याच्या अवघ्या २५  वर्षाच्या कालखंडातच वीर, मसीहा, क्रांतीकारक, देवता, जननायक, भगवान, स्वातंत्र्य सेनानी अशा नावांनी ओळख निर्माण करणारे बिरसा मुंडा आजही युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत. आज त्यांची १४४ वी  जयंती निमित्त त्यांच्याविषयी वाचनातून काही महत्वाचे पैलू युवकांसाठी महत्वाचे असल्याने ते मांडावे असे वाटले. बिरसा मुंडा हे आदीवासी क्रांतीकारक इंग्रजांविरूद्ध लढले अशी ख्याती असली तरी त्यांच्या २५ वर्षाच्या आयुष्यातील कित्येक गुण प्रत्येकाने आत्मसात करावे असेच आहेत. बिरसा यांचे युवकांवर छाप पाडणारे गुण यामध्ये शिक्षणाची आवड, अन्याविरूद्ध लढा, लोकसेवा, अंधश्रद्धा निर्मूलन, संघटन, निसर्गप्रेम हे मला वाचनातून लक्षात आले. त्यांचा जन्म जरी आदीवासी गरीब कुटुंबात झाला असला तरी त्यांनी कधीच प्रयत्न सोडले नाहीत. त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव असल्याचे संदर्भ विविध पुस्तकांमध्ये नमूद आहेत. मिळेल ते काम करून त्यांनी गुजारा केला. या दरम्यान धर्म, संस्कृतीबाबतची माहिती व शालेय शिक्षण आत्मसात केले. यातून त्यांना जीवन, समाज व हक्कांची जाणीव झाली. यातूनच अवघ्या १५ वर्षाच्या वयात अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्यास त्यांनी सुरूवात केली. अशा या तरूण क्रांतिकारकाचे गुण आजही आपण आत्मसात करावे असेच आहेत.
बिरसा मुंडा यांना लहानपनापासूनच शिक्षणाची आवड असल्याचे कित्येक ग्रंथांमध्ये नोंद असल्याचे आढळते.शालेय शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी ख्रिश्चन शाळेत दाखला घेतला. त्या काळी ख्रिश्चन मिशनरी धर्म बदलण्याच्या अटीवर मुलांना शिक्षण देत असत. त्यांनी धर्मही बदलला. मात्र तेथील धर्म गुरूंची शिकवण विविध कार्यक्रमांतून आदीवासी विरूद्ध मांडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याबाबत आवज उठवला. परिणामी त्यांना शाळेतून  काढून टाकण्यात आले. यानंतर त्यांनी शिक्षणाची आवड चालुच ठेवली. गाव बदलल्यानंतर गावातील स्थानिक गुरू, प्रवचन सांगणारे गुरू यांच्याकडून शिक्षण आत्मसात करण्यास सुरूवात केली. यातूनच अवघ्या तीन वर्षात त्यांनी महाभारत, रामायण यासारख्या धर्मग्रथांमधून तसेच विविध प्रवचनांमधून आयुष्याचे धडे घेतले. समाज, जीवन याची चांगली ओळख त्यांना याच शिक्षणातून झाल्याची नोंद आढळून येते. म्हणजेच आज डिजीटल युगात राहणा-या तरूणांनाही याबाबत काहीतरी विचारांच्या आचरणाची गरज असल्याचे स्पष्ट होते. आपण कोणते शिक्षण घ्यावे? तें का घ्यावे? यातून आपल्याला आवश्यक जीवनाचे, समाजव्यवस्थेचे ज्ञान प्राप्त होतेय का? याचा विचार नक्की करायला हवा.
लोकसेवा हा बिरसा मुंडांचा महत्वाचा पैलू. त्यांची ओळख लोकसेवेतूनच निर्माण झाली. ज्या समाजात, ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलेा, त्यांच्यासाठी आपण काहीतरी देणे लागतोय याची जाण त्यांना होती. मनुष्यप्रेम हा विचार समोर ठेवून त्यांनी लोकसेवा आंगिकारली. १८९४ च्या दुष्काळात चेचक रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाला. इंग्रजी सत्तेने यासाठी कोणतीही मदत दिली नाही. बिरसा मुंडा यांनी गावोगावी फिरून लोकसेवा केली. लोकांना झाडपाला औषधी दिले. त्यातून लोकांना त्यांचा फायदा झाला. यातून त्यांच्याकडे लोक येवू लागले. त्यांनी आदीवासी भागात स्वच्छतेचे महत्त्व पटवून रोगराई दूर करण्यासाठी प्रयत्न केले. लोकसेवा लोकांना करून आणि समजून सांगितली. याचवेळी त्यांनी आंधश्रद्धा आदीवासी लोकांसाठी कशी घातक आहे हेही समजून सांगण्यास सुरूवात केली. 
अंधश्रद्धा आंगिकारून आदीवासींचे नुकसान होत आहे हे त्यांनी त्यावेळी सांगितले. विनाकारण पैसे वाया घालवू नका, मटन मांसासाठी बळी देवू नका अशी त्यांची शिकवन होती. बिरसा मुंडा यांनी कित्येक गावात प्रवचनातून मार्गदर्शनातून लोकांना शिकवण दिली. युवा काळात त्यांनी मनुष्यप्रेम लोकांना शिकविले. अंधश्रद्धा नाकरून आपण आज आपला विकास साधावा. चुकीच्या पद्धती बदलून चांगले राहणीमान स्विकारू असेच काय त्यांचे विचार असल्याचे त्यावरून स्पष्ट होते. आजच्या युवकांनीही हीच बाब आत्मसात करावी असे वाटते. संघटन या कौशल्यातून त्यांची ख्याती सर्वदूर पसरल्याचे लिहले गेले आहे. आणि ते तेवढेच खरेही आहे. २० -२२ वर्षाचा युवक सर्व आदीवासी समाजात एक नेतृत्व म्हणून समोर येतो ही छोटी बाब नव्हे. बिरसा मुंडा यांचे नेतृत्व गुण, संघटन मोठया क्षमतेचे असल्याचे निदर्शनास येते. लोकसेवा, अन्यायाविरूद्ध लढा यातून त्यांनी कित्येक लोकांना एकत्रित केले. यातून त्यांनी आदीवासीं बांधवांसाठी नेतृत्व स्विकारले. चुकीच्या बाबी नाकारल्या, अन्याया विरूद्ध आवाज उठविला, लोकांना सत्याचा मार्ग स्विकारण्यास भाग पाडले यातून त्यांचे संघटन वाढत गेले. तरूण वयात उच्छ विचारसारणी समोर ठेवून त्यांनी कार्य केल्याचे दिसून येते.
  
                                                                                                - सचिन वि.अडसुळ
                                                                        जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली
  Print


News - Editorial | Posted : 2019-11-14


Related Photos