कसनसूर येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेतील इतिवृत्तांविषयी चौकशी करा


- जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथील शाळा व्यवस्थापन समितीची सभा 9 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या सभेतील विषय क्रमांक 4 च्या इतिवृत्ताविषयी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कसनसूर येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 
4 ऑक्टोबर 2019 रोजी शाळा व्यवस्थपन समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमार्फत प्रत्येक मासिक सभेत शालेय पोषण आहार आढावा घेतला जात असून या सभेत शालेय काही साहित्य गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी कम्पुटर चोरीला गेला. त्यामुळे या शाळेकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. तरी वरिष्ठांनी तत्काळ भेट देवून चैकशी करण्यात यावी. तसेच जे. जी. आत्राम हे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असून 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये मद्यप्राशन करुन होते. त्यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या वर्तनाविषयी चर्चा केली असता पदाधिकाऱ्यांना उद्धट बोलून या शाळेत मला राहायचे नाही, असे बोलून सभेतून निघून गेले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षक आत्राम यांना बोलाविण्यास पाठविले असता मला शाळेत यायचे नाही व मला या शाळेत राहण्याची इच्छा नाही, असे बोलून दाखविले व शाळेबाहेर निघून गेले. त्यामुळे सदर शिक्षकांची तक्रार वरिष्ठांकडे करण्याचे ठरविण्यात आले आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देवून 9 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेतील विषय क्रमांक 4 च्या इतिवृत्ताविषयी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कसनसूर शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषेदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. या निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पुंगाटी, उपाध्यक्षा मनीषा येनगंटीवार, सदस्या बबिता मडावी, सदस्य सुनील मडावी, रवींद्र जंपलवार, राकेश कोपुलवार, मीना मडावी, अभिजीत सिकंदर, सुरेश उसेंडी, छाया मडावी, वनिता निकोडे, वनिता गावडे, सुनीता मडावी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-14


Related Photos