पोलिसांनी जप्त केल्या पाचशे व दोन हजार रुपयाचे बनावटी नोटा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अहमदनगर :
  नगर-सोलापूर महामार्गावरील श्रीगोंद्यातील मांडवगण फाटा येथे एका वाहनातून दोन हजार व पाचशे रुपयांच्या २ लाख ८३ हजार ५०० रुपये किमतीच्या नोटा पोलिसांनी सापळा रचून पकडल्या. बनावट नोटा बाळगणाऱ्याला एकाला पोलिसांनी अटक केली. या बनावट नोटा देऊन सोने खरेदी करायचे होते. परंतु, त्यापूर्वीच पोलिसांनी बनावट नोटा जप्त केल्या. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली.
बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी अतुल रघुनाथ आगरकर (वय २६ रा. जवळवाडी-सुपा, पारनेर) याला अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी न्यायालय़ात हजर केले असता १२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली. एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून एक जण बनावट नोटा घेऊन घोगरगाव येथे सोने खरेदी करण्यासाठी येत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे निरीक्षक दौलत जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यांनी बुधवार दुपारपासून मांडवगण फाटा येथे सापळा रचला होता. बुधवारी सायंकाळी एक काळी रंगाची कार पोलिसांनी थांबवून वाहनाची झडती घेतली. त्यात वाहनाच्या मागील सीटच्या हॅण्डरेस्टच्या आतल्या कप्यामध्ये एका रुमालामध्ये पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. तर वाहनचालक आगरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या वाहनातून २ हजार रुपयांच्या ९२ बनावट नोटा व पाचशे रुपयांच्या १९९ बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. २ लाख ८३ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न होता. याप्रकरणी आगरकर व माने (पूर्ण नाव नाही) यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिस स्टेशनला बनावट नोटाप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी नोटा बंदी झाल्यानंतर नव्याने आलेल्या दोन हजार रुपयांची एक बनावट नोट श्रीगोंद्यात आढळून आली होती. पेट्रोलपंपावर ही नोट देऊन चलनात आणण्याचा प्रयत्न झाला होता.
अटक केलेला आरोपी आगरकर याने या नोटा दुसऱ्याच्या असल्याचे सांगितले. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील माने नावाच्या व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी सोने खरेदी करण्यासाठी या नोटा दिल्या होत्या, असे आरोपी आगरकर पोलिस चौकशीत सांगत आहे. परंतु, तो मानेचे पूर्ण नाव सांगत नाही. त्यामुळे मिरजगावमधील माने नावाचा व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आहे. या नोटा कुठे छापल्या जात आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2019-11-08


Related Photos