सातारा जिल्यातील अंबानी गावात बिबट्यांने घरात घुसून केला शेळीवर हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /  सातारा :
सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कास पठारापासून जवळच असलेल्या अंबाणी गावात एका बिबट्यानं घरात घुसून शेळीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. शेळीची तडफड ऐकून जागे झालेल्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबळ्यानं धूम ठोकली. या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत.
आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अंबाणीचे ग्रामस्थ संतोष भोसले यांच्या घराच्या दरवाज्याला छोटीसी फट आहे. या फटीतून बिबळ्या आत घुसला. आत घुसल्यावर गोठ्यात असलेल्या शेळीवर त्यानं हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळं शेळी बिथरली आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली. त्यामुळं गोंधळ होऊन भोसले यांच्या घरातील लोक जागे झाले. समोर बिबळ्या पाहून तेही दचकलेच, पण लगेचच सावरून त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर बिबळ्या शेळीला सोडून पळून गेला. शेळीच्या मानेला बिबळ्याचे दात लागले आहेत. रक्तबंबाळ झालेल्या या शेळीवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अंबाणी गावचे लक्ष्मण गोगावले यांनी दिली.
गावातील ग्रामस्थांनी भोसले यांच्या घरी धाव घेतली असून धोंडवड येथील वनखात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. थोड्याच वेळात अधिकारी गावात पोहोचून पंचनामा करणार आहेत. भोसले यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घरात घुसून बिबळ्यानं हल्ला केल्याचं वृत्त आजूबाजूच्या गावांतही पसरलं असून त्यामुळं प्रचंड घबराट उडाली आहे. अनेक गावांमध्ये घरांना पक्के दरवाजे नसतात. अनेक लोक गोठ्यांच्या दरवाजांना केवळ फळ्या लावून रात्रीपुरता त्याला आतून काहीतरी आड लावतात. मात्र, थोडासा जोर लावला तर हे दरवाजे उघडतात. अशी परिस्थिती असल्यानं गावकऱ्यांमध्ये अधिकच चिंता आहे. बिबळे असे घरात घुसू लागले तर काय करायचं, असे प्रश्न लोक एकमेकांना विचारत आहेत.
  Print


News - Rajy | Posted : 2019-11-08


Related Photos