एक्स-रे तपासणी करत असताना एक्स रे मशिन फुटल्याने एका वर्षाची लहान मुलगी भाजली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
एक्स-रे तपासणी करत असताना एक्स रे मशिन फुटल्याने एक वर्षाची लहान मुलगी भाजल्याची घटना गुरुवारी  दुपारी साडेतीनच्या सुमारास न्युक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर, पिंपरी येथे घडली. शार्वी भूषण देशमुख (वय १) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्वीला युरिन इन्फेक्शन झाल्याने तिच्यावर मागील एक महिन्यापासून सांगवी येथील भालेराव चिल्ड्रन हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. भालेराव हॉस्पिटलमधून शार्वीच्या पालकांना काही तपासण्या करण्यास सांगितले. हॉस्पिटलकडून पिंपरी येथील न्युक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमधून तपासण्या करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार शार्वीच्या पालकांनी तिला पिंपरी येथील न्युक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आणले. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शार्वीला तपासणीसाठी लॅबमध्ये घेतले. शार्वीच्या आई आणि आजोबांच्या उपस्थितीत तपासणी सुरू होती. मशिनमध्ये शार्वीची तपासणी सुरू असताना अचानक एक्स रे मशिनचा काही भाग फुटला. त्या फुटलेल्या भागातून विशिष्ट प्रकारचे रसायन सांडले. हे रसायन शार्वी, तिची आई आणि आजोबांच्या अंगावर सांडले. त्यात शार्वी किरकोळ जखमी झाली. दरम्यान, घटनेनंतर काहीही झाले नसल्याचे सांगून डॉक्टरांनी शार्वीच्या पालकांना जाण्यास सांगितले."सेंटरमधील डॉक्टरांनी या घटनेत हलगर्जीपणा दाखवला असून, कोणीही मदतीला आले नाही. हे तुमच्या घरी झाले असते तर काय केले असते, असे तेथील डॉक्टरांनी सुनावले अशी माहिती शार्वीची आई प्रियंका यांनी दिली. ही घटना वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने थेट गुन्हा दाखल करता येणार नाही. याबाबतची कागदपत्र ससून रुग्णालयाच्या समितीकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर संबंधित समितीचा निर्णय आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
  Print


News - Rajy | Posted : 2019-11-08


Related Photos