तिसऱ्या कोणाचीही मध्यस्थी नको, मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव घेऊन येणार असाल तर बोला : संजय राऊत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
'भाजप-शिवसेनेमध्ये तिसऱ्या कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव घेऊन येणार असाल तर बोला,' अशा शब्दांत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भूमिका मांडली. त्यामुळं आता सत्तास्थापनेचा चेंडू भाजपच्या कोर्टात असून भाजप काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस उलटल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. मावळत्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळं विधानसभेत मोठा पक्ष असलेला भाजप व महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र, शिवसेना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन हीच भूमिका मांडली.
'शिवप्रतिष्ठान'चे अध्यक्ष संभाजी भिडे हे उद्धव ठाकरे यांना भेटून मध्यस्थी करणार असल्याचं वृत्त राऊत यांनी फेटाळलं. 'हा शिवसेना-भाजपचा प्रश्न आहे. तिसऱ्यांनी मध्ये येण्याची गरज नाही आणि त्याचा उपयोग होणार नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा लेखी प्रस्ताव कोणी घेऊन येणार असेल तर बोला. मी उद्धव ठाकरे यांना तशी माहिती देईन, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
भाजप महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चेवरही राऊत यांनी भाष्य केलं. 'महाराष्ट्रात घोडेबाजाराची भीती कुणाला वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक कारभाराला दिलेलं ते आव्हान असेल. शिवरायांच्या महाराष्ट्रात असला कुठलाही पॅटर्न चालणार नाही. न्याय व अस्मितेची लढाई सुरूच राहील. आमच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नाही. आमचा चेहरा काळवंडलेला नाही. दिल्लीपुढं कोणीही झुकणार नाही. शरद पवार झुकले नाहीत. उद्धव ठाकरेही झुकणार नाहीत,' असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
जास्तीत जास्त काळ 'काळजीवाहू' बनून सूत्रे हलवण्याचे डावपेच व कटकारस्थानं राज्यात सुरू असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला. 'राष्ट्रपती राजवट लागू करण्याचंही षडयंत्र सुरू आहे. जनतेनं बहुमत न देताही राज्य करायचं हा 'न मिळालेल्या' जनादेशाचा अपमान आहे. घटनेचा व कायद्याचाही अपमान आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल,' असं राऊत म्हणाले.
  Print


News - Rajy | Posted : 2019-11-08


Related Photos