सात गुन्हयातील जप्त करण्यात आलेला ८ लाखांचा गांजा नष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयातील पोलीस स्टेशन सिरोंचा, आरमोरी, देसाईगंज व चामोर्शी येथील न्यायनिवाडा झालेल्या एकूण 7 गुन्हयातील जप्त 98 किलो 895 ग्रॅम वजनाचा व 7 लाख 99 हजार 122 रुपये किंमतीचा गांजा कायदेशीर प्रक्रियेद्वारे आज, 5 नोव्हेंबर 2019 रोजी नष्ट करण्यात आला.
शासनाच्या परवानगीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली, पोलीस उपअधीक्षक गोरख गायकवाड, पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांची गांजा नष्ट करण्याकरिता समिती गठित करण्यात आलेली होती. या समितीमार्फत न्यायालयाकडून निकाली निघालेल्या एकूण 7 गुन्हयातील जप्त असलेला 98 किलो 895 ग्रॅम वजनाचा व 7 लाख 99 हजार 122 रुपे किंमतीचा गांजा पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील पटांगणात खड्डा खोदून लाकडे व ज्वलंतशील पदार्थांच्या मदतीने पर्यावरणास कुठलीही हानी होणार नाही याची दक्षता घेउन न्यायदंडाधिकारी एन. पी. वासाडे, प्रथम श्रेणी गडचिरोली यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत नष्ट केलेला आहे.
सदर प्रक्रियेदरम्यान न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर येथील मधुसूदन पोशेटटीवार, जिल्हा परिषद गडचिरोली येथील नामदेव वाळके, अब्दुल अन्सार शेख व वनज माफे विभाग गडचिरोली येथील रुपचंद फुलझेले उपस्थित होते. सदर प्रक्रियेकरिता स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम जगताप, सहायक फौजदार किशोर इंगोले, पोलीस हवालदार भाऊराव बोरकर, कान्हू गुरनुले, नरेश सहारे, पोलीस शिपाई नुतेश धुर्वे, संदीप पराते यांनी विशेष परिश्रम घेतले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-06


Related Photos