गडचिरोलीच्या सर्पमित्रांची कमाल, कृत्रिमरीत्या सापांची अंडी उबविण्याचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी


- ५८ दिवसांनी अंड्यांतून बाहेर आले साप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कृत्रिमरीत्या सापांची अंडी उबवून सापांच्या पिल्लांना जन्म देण्याचा पहिला प्रयोग गडचिरोली येथील सर्पमित्रांनी यशस्वी केला आहे. काल ४ नोव्हेंबर रोजी तब्बल ५८ दिवसांनी कृत्रिमरित्या उबवलेल्या अंड्यांमधून सापाची पिल्ले बाहेर आली. 
गडचिरोली येथील सर्पमित्र अजय कुकडकर यांनी ७ सप्टेंबर २०१९ रोजी येथील शासकीय विश्रामगृहात तस्कर जातीच्या बिनविषारी सापाला पकडले होते. या सापाला पकडल्यानंतर काहीवेळातच सापाने ७ अंडी दिली. पावसाळ्याचे दिवस असल्याने व सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे अंडी ठेवायची कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. यामुळे त्यांनी सापाला सुखरूप सोडून दिल्यानंतर कृत्रिमरीत्या उबवून अंड्यांना जीवनदान देण्याचा निर्णय घेतला. याबाबत गडचिरोली वनपरीक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक प्रमोद जेनेकर यांना माहिती देवून सदर अंडी सुरक्षितरित्या एका बरणीत ठेवण्यात आले. सर्पमित्र अजय कुकडकर, प्रशिक झाडे, पंकज फरकाडे, मयुर सिडाम यांनी अंडी सुरक्षित राहावी यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती केली. दररोज अंड्यांची देखभाल केली.  यासाठी काही भंडारा येथील अनुभवी सर्पमित्रांची मदत घेण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतर काल ४ नोव्हेंबर रोजी अंड्यांमधून पाच पिल्लांनी जन्म घेतला आहे तर दोन अंडी  खराब झाल्याचे निदर्शनास आले. या पिल्लांना सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले आहे. 
यावेळी क्षेत्रसहाय्यक प्रमोद जेनेकर, मनोज पिपरे, दैवत बोदेले, गणेश देवावार, सचिन जिवतोडे, होमदेव कुरवटकर, निरज सावळेे, मकसुद सय्यद, गोलु जुवारे आदी उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-05


Related Photos