वडधम ते चिटूर मार्गाच्या डांबरीकरणाची चौकशी करा


- नागरीकांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अंकीसा :
सिरोंचा तालुक्यातील अंकीसा गावाजवळील वडधम ते चिटूर या ६ किमी मार्गाचे डांबरीकरण यंग कंस्ट्रक्शन च्या माध्यमातून करण्यात आले. या डांबरीकरणाच्या कामासाठी तब्बल १.५ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. मात्र रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी चिटूर येथील नागरीकांनी केली आहे.
रस्त्याचे काम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहेत. यामुळे १.५ कोटींचा निधी कुठे मुरला, असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे. डांबरीकरण केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच रस्त्यावरील डांबर उखडलेले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील माती दिसून येत आहे. मार्गावर वाहनांची फारशी वर्दळ सुध्दा नसते. केवळ दुचाकीस्वारांचे आवागमन सुरू असते. असे असतानाही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे कंत्राटदार आणि अभियंत्याच्या संगणमताने या रस्त्याचे काम निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
चिटूर हे गाव मुख्य मार्गापासून वडधम येथून ६ किमी अंतरावर आहे. या गावात आजपर्यंत रापमची बससुध्दा पोहचलेली नाही. अशा गावाच्या विकासासाठी शासनाने   १.५  कोटी रूपये देवून रस्ता निर्माण करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्गम भागातील नागरीकांना विकासापासून वंचित ठेवण्याचे काम शासकीय यंत्रणा व कंत्राटदार करीत आहेत.  यामुळे या कामाची चौकशी करून सबंधित अभियंता तसेच कंत्राटदारावर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी सतिश तुलसिगिरी, मनोहर इनमुला, सुदर्शन तुलसिगिरी, महेश आकुला, गंगय्या अल्लम, मडावी चंद्रम आदींनी केली आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-04


Related Photos