मुख्याध्यापकावर नेतेगिरीचा दबाव आणत अनुपस्थित राहूनही वेतन उचलणारा शिक्षक मिसार निलंबित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
सात महिने वारंवार रजेचे अर्ज परस्पर सादर करून अनुपस्थितीत राहूनही मुख्याध्यापकावर नेतेगिरीचा दबाव आणत हजेरीपटावर स्वाक्षरी करीत गैरहजर दिवसांतील वेतन उचलणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील  शिक्षकाला गडचिरोली जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राठोड यांनी निलंबित केले आहे. धनपाल रामकृष्‍ण मिसार, असे निलंबित शिक्षकाचे नाव आहे.
धनपाल  मिसार हा आरमोरी तालुक्यातील येंगाळा येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या कार्यरत होता. तो सिरोंचा तालुक्यातील येडशील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असताना आपण शिक्षक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगत मुख्याध्यापकावर दबाव आणायचा. त्यामुळे अनुपस्थित असतानाही तो हजेरीपटावर स्वाक्षरी करायचा. यावर्षी एप्रिल ते १६ सप्टेंबर २०१९ या कालावधीत त्याने हजेरीपटावर स्वाक्षरी करून खोटे दस्तावेज तयार केले व गैरहजर दिवसातील वेतनाची उचल केली. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी केली असता दोषी आढळून आल्याने शिक्षक धनपाल मिसार याच्यावर जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात मुख्यालय कोरची तालुका देण्यात आला असून पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत. या कारवाईमुळे जिल्हा परिषद शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-04


Related Photos