पिक - नुकसानीचे पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे


- पिक - नुकसानीची केली पाहणी
- शेतकऱ्यांशी साधला संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया  :
या वर्षी जिल्हयात आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी काल २ नोव्हेबर रोजी गोरेगाव, सडक/अर्जुनी आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यात पिक - नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.  तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांना संयुक्तपणे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शासनाच्या आदेशानुसार सर्वच महसूल मंडळातील ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे गावनिहाय अचूकपणे पंचनामे करुन संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच उपस्थित विमा कंपनीच्या प्रतिनीधींना पिक-विमा काढलेल्या व पिक-विमाकरिता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या शेत-पिकांचे नुकसानीचे दावे लवकरात लवकर काढण्याचे निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेन्द्र पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नयनवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी डि.के.वानखडे, गोरेगाव तहसिलदार शेखर पुनसे अर्जुनी/मोरगाव तहसीलदार विनोद मेश्राम संबंधित तालुका कृषि अधिकारी, तलाठी, कृषिसेवक सरपंच व सदस्य तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेतली. त्याचबरोबर पंचनामे करताना येणारे अडथळे जाणून घेतले. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून शासकीय मदती संबंधीची कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे सांगून शेतकऱ्यांना आश्वस्त केले. शेतपिकांची पाहणी करुन पंचनामे तीन दिवसांत अचुकपणे पूर्ण करण्याच्या सुचना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या. पिक-नुकसानीबाबतच्या कार्यवाही सुरळीत पार पाडण्यासाठी तालुकानिहाय उपजिल्हाधिकारी यांची नोडलअधिकारी म्हणुन नियुक्ती केली.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यास याबाबतची माहिती तलाठी, कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी केले आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-11-03


Related Photos