जिल्हा पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस बल आणि जनतेच्या सहकार्याने निर्विघ्न निवडणूका : डीआयजी मानस रंजन


- केद्रीय राखीव पोलीस दलाचे डिआयजी मानस रंजन यांनी सर्व जनतेचे मानले आभार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूका जिल्हा पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस बल आणि जिल्ह्यातील जनतेच्या सहकार्याने निर्विघ्न पार पडल्या आहेत. निवडणूक   शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व केंद्रीय राखीव दलाच्या कामात सामान्य जनतेने  जे सहकार्य केले ते अत्यंत वाखाणण्याजोगे आहे,  अशी माहिती केंद्रीय राखीव पोलिस बलाचे उपमहानिरीक्षक मानस रंजन यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.   यावेळी सीआरपीएफचे अधिकारी जे. सिंग व कैलास गंगावणे प्रामुख्याने उपस्थित होते.
डिआयजी मानस रंजन म्हणाले, नक्षलग्रस्त भाग म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. यामुळे निवडणूका निर्विघ्न पार पाडणे हे प्रशासनापुढे आव्हान होते. निवडणूकीच्या काळात नक्षल्यांनी अनेक कारवाया करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हा पोलिस आणि सिआरपीएफने नक्षल्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृतीमुळे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारीही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. 
निवडणूकीच्या काळात सिआरपीएफच्या विविध तुकड्या जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या होत्या. शांततेत निवडणूका पार पडल्यानंतर सर्व तुकड्या आपआपल्या कार्यरत ठिकाणी रवाना झाल्या आहेत. 
 कोणतीही दुर्घटना न होता ही निवडणूक संपन्न झाली. असेच सहकार्य नागरिकांकडून अपेक्षीत आहे.  शासकीय योजनांची व्यवस्थीत अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य  लाभणे आवश्यक आहे. सीआरपीएफ च्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांना सिव्हिक ऍक्शन कार्यक्रमांतर्गत साहित्य वितरित केले जाते. नागरिकांच्या मागणीनुसार व गरजेनुसार सुविधा निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत सीआरपीएफ जनतेच्या सोबत असते. युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाता यावे याकरिता क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बेरोजगारांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.  जिल्ह्यातील युवकांना सीआरपीएफच्या भरतीमध्ये सामील होण्यासाठी कोणत्या तयारीची गरज आहे, याबद्दल प्रशिक्षणाचे आयोजन करू, दुर्गम भागातील आदिवासी युवकांना भारत दर्शन करण्याकरीता सहल आयोजीत केली जाते, यामध्ये सहभाग नोंदवावा असे त्यांनी आवाहन केले आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध  होण्याकरीता विविध प्रकारचे प्रशिक्षण, साहित्य व आर्थिक मदत दिल्या जात आहे. तेव्हा युवकांनी याचा लाभ घ्यावा असेही डिआयजी मानस रंजन यावेळी म्हणाले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-01


Related Photos