राज्य नेतृत्वच शिवसेनेच्या नेतृत्वाशी चर्चा करून सत्ता स्थापन करेल : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका


वृत्तसंस्था :  ५० - ५० च्या फॉर्मुल्यावर  शिवसेना अडून बसल्याने भाजप-शिवसेना युती सरकारच्या स्थापनेत तिढा निर्माण झाला असतानाच, 'सत्तेच्या वादावर राज्यातच तोडगा निघावा', अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेची बोलणी करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत येणार नसून, पक्षाचे राज्य नेतृत्वच शिवसेनेच्या नेतृत्वाशी चर्चा करून दोन-तीन दिवसांत सत्ता स्थापन करेल, असे भाजपकडून गुरुवारी सांगण्यात आले.
शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि १३ ते १६ मंत्रिपदे देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेत्यांना तसा निरोपही पाठवला आहे; परंतु, शिवसेनेने अद्याप त्यावर प्रतिसाद दिलेला नाही. उलट, 'भाजपने कोणताही प्रस्ताव पाठविलेला नाही', अशी भूमिका सेनानेतृत्वाने घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमित शहा मुंबईत येणार असल्याचे बुधवारी भाजपने सांगितले होते. मात्र, 'राज्य नेतृत्वाच्या स्तरावर सेनेशी चर्चा करून वाद संपवावा', असे शहा यांनी सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष पाटील हे सेना नेत्यांच्या संपर्कात आहेत.
नगरविकास, गृह आणि महसूल यांऐवजी सार्वजनिक बांधकाम, अर्थ, ऊर्जा, उत्पादनशुल्क आदींपैकी काही खाती भाजप सेनेला देण्यास तयार आहे. सेना नेतृत्वाने हा प्रस्ताव मान्य केला नसल्याचे कळते. मात्र, ८ नोव्हेंबरपूर्वी सत्ता स्थापन करावी लागणार असल्याने दोन दिवसांत तोडगा निघेल, अशी भाजप नेतृत्वाला आशा आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-11-01


Related Photos