महत्वाच्या बातम्या

 महा आवास अभियान २०२०-२१ मध्ये नागपूर विभागाने उमटवली मोहोर


- उद्या मुंबईत होणार राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महा आवास अभियान- 2020-21 अंतर्गत नागपूर विभागाने दमदार कामगिरी करीत अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. या अभियानांतर्गत अनेक पुरस्कार नागपूर विभागाला मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मंत्रिमहोदय व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे या पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गतीमानता व गुणवत्ता आणण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राज्यात अमृत महा आवास अभियान 2022-23 राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभही यावेळी करण्यात येणार आहे.

महा आवास अभियान- 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण) मध्ये नागपूर विभागाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव हा तालुका प्रथम क्रमांकाचा ठरला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तडेगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्वोत्तम तालुका हा गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ठरला आहे. सर्वोत्तम ग्रामपंचायतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचातय तृतीय क्रमांकावर आहे.  

रमाई आवास योजनेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार हा गोंदिया जिल्ह्याला मिळाला आहे. तर तृतीय चंद्रपूर जिल्ह्याला मिळाला आहे. शबरी आवास योजना पुरस्कार भंडा-याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. यासोबत विविध विभागातील अनेक पुरस्कारांवर नागपूर विभागाने आपली मोहोर उमटवली आहे.

महा आवास अभियान- 2020-21 अंतर्गत राज्यस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीमार्फत निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थी संस्था व व्यक्ती तसेच पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित पुरस्कार प्राप्त संस्थांमध्ये सध्या कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी यांचे व्यतिरिक्त 2020-21 च्या अभियान कालावधीत कार्यरत असणारे (तत्कालीन) अधिकारी, कर्मचारी यांनी देखील पुरस्कार प्रदान कार्यक्रमास उपस्थित रहावयाचे आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos