महत्वाच्या बातम्या

 मतदान अधिकाऱ्यांनी ४६२ मतदान पथके आज रवाना


- हेलिकॉप्टरद्वारे ८०, बसने ३५९ आणि जीपद्वारे २३ पथके बेसकॅम्पवर पोहचली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :  12-गडचिरोलीलोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. हे मतदान घेण्यासाठी निवडणूक विभागातर्फे मतदान अधिकाऱ्यांची पथके कालपासूनच रवाना करण्यात येत असून आज जिल्ह्यातील एकूण 462 पथके रवाना करण्यात आली. त्यातील 80 पथके हेलिकॉप्टरद्वारे पाठविण्यात आली आहेत. 

जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात आज हेलिकॉप्टरद्वारे 80 पथके रवाना करण्यात आली. यात आरमोरी येथील 40, गडचिरोलीतून 12 आणि अहेरी येथील 28 पथकांचा समावेश आहे. तसेच बसद्वारे आरमोरी येथून 84, गडचिरोलीतून 183 व अहेरी येथून 92 पथके आणि जीपद्वारे आरमोरी विधानसभा मतदार संघातून 3, गडचिरोली येथून 19 आणि अहेरी येथून एक पथक रवाना करण्यात आले. प्रत्येक पथकासोबत झोनल अधिकारी देखील रवाना झाले आहेत.

जिल्ह्यातील दुर्गम भागात मावोवादाचा धोका पाहता 16 एप्रिलपासूनच निवडणूक पथके बेसकॅम्पवर पाठविण्यात येत आहेत. याअंतर्गत काल अहेरी येथून 68 मतदान पथकांना हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीकरिता विधानसभा मतदार संघनिहाय एकूण 1891 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यात आमगाव 311, आरमोरी 302, गडचिरोली 356, अहेरी 292, ब्रम्हपुरी 316 तर चिमुर विधानसभा मतदारसंघात 314 मतदान केंद्र राहणार आहेत. यातील 319मतदान केंद्रे संवेदनशील तर 200 केंद्र अतिसंवेदनशील व 16 मतदान केंद्रांचे तीव्रसंवेदनशील असे वर्गीकरण जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अतिरिक्त विभागीय आयुक्तांचा पथकाशी संवाद :
आज सकाळी गडचिरोली येथील एम.आय.डी.सी. मैदानाच्या हेलिपॅडवर अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे यांनी हेलिकॉप्टरने बेसकॅम्पवर जाणाऱ्या पथकातील मतदान अधिकाऱ्यांशी संवाद साधला. केंद्राध्यक्ष कोण आहे, टिममध्ये कोण-कोण आहे, कोणत्या मतदान केंद्रावर ड्युटी आहे, तिथे जाण्यासाठी किती अंतर पायी जावे लागेल, निवडणूक विभागाद्वारे जेवण, नाश्ता देण्यात आला आहे का, हेलिकॉप्टरने यापूर्वी गेले आहेत का याबाबत आस्थेने विचारपूस करून माहिती घेतली व एकमेकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी राहुल मीना, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके हे यावेळी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos