महत्वाच्या बातम्या

 अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार घोषित


- रणदीप हुड्डाचाही होणार सम्मान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांना दिल्या जाणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात येणार आहे. मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायक रूपकुमार राठोड, हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर, हरिश भिमानी, रवी जोशी आदी मंडळी उपस्थित होती.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार असल्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी घोषित केले. अलीकडेच नागपूरमध्ये संपन्न झालेल्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय म्युझिक पुरस्कार सोहळ्यात रूपकुमार राठोड यांचा सूर ज्योत्स्ना आयकॉन इन म्युझिक अवाॅर्ड देऊन गौरव केला होता. राठोड यांना आता प्रदीर्घ संगीत सेवेसाठी दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही घोषित झाला आहे.

गालिब ठरले उत्कृष्ट नाटक : 
२०२३-२४ वर्षातील उत्कृष्ट नाटक निर्मितीसाठी दिला जाणारा मोहन वाघ पुरस्कार गालिब या मराठी नाटकाला, तर समाजसेवेसाठी दीपस्तंभ फाउंडेशन मोनोबल या संस्थेला आशा भोसले यांच्यातर्फे आनंदमयी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मंजिरी फडके यांना प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी वाग्विलासीनी पुरस्कार घोषित केला आहे.

सांगीतिक मानवंदना : 
दीनानाथ मंगेशकर यांचा ८२ वा पुण्यतिथी सोहळा २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता विले पार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात संपन्न होणार आहे. यावेळी श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी या संगीतमय कार्यक्रमाद्वारे भारतरत्न लता मंगेशकर यांना हृदयनाथ मंगेशकर सांगीतिक मानवंदना सादर करतील.

संगीत सेवेसाठी संगीतकार ए. आर. रहमान, नाट्य-सिनेसृटीतील सेवेसाठी अशोक सराफ, सिनेसृष्टीतील सेवेसाठी पद्मिनी कोल्हापुरे, पत्रकारितेसाठी भाऊ तोरसेकर, नाट्यसेवेसाठी अतुल परचुरे, उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी रणदीप हुड्डा यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos