जिल्ह्याच्या ७०.२६ टक्के मतदानामागे मतदार व निवडणूक कर्मचाऱ्यांचे योगदान तर पोलीस दलाचे पाठबळ : शेखर सिंह


- आरमोरी -  72.13 टक्के, गडचिरोली - 68.54 टक्के,  अहेरी -70.34 टक्के

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यात  शांततापूर्ण निवडणूका पार पडल्या असून अंतिम ७०.२६  टक्के सरासरी मतदान झाले, अन् लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. मतदान प्रक्रिया संपल्या नंतर निवडणूक कर्मचारी व पोलिस दल सुखरुप परतले आहेत. अतिदुर्गम भागातील परिस्थिती, पाऊस, नदी-नाल्यातील पाणी या अडचणींवर मात करुन मतदार, निवडणूक कर्मचारी व पोलीस यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. विधानसभा निवडणूका २०१४ सह २००९ चा आकडा पार करुन लोकसभेच्या जवळपास या निवडणूकीची सरासरी गेली. यावरुनच गडचिरोली मधील मतदार लोकशाहीबाबत जागृकता दाखवत असल्याचे समोर आले आहे. राज्यात जिल्हयाची मतदान सरासरी दुस-या क्रमांकाची ठरली. यामध्ये संपुर्ण योगदान हे मतदार, निवडणूक कर्मचारी व पोलीस दलाचे आहे असे शेखर सिंह यांनी आभार व्यक्त करताना सांगितले.
जिल्ह्यातील स्वीप कार्यक्रमांतर्गत गावोगावी केलेली जनजागृती व मतदारांचा विश्वास या दोन बाबी या विधानसभा निवडणूकांमध्ये वैशिष्टयपूर्ण ठरल्या. प्रत्येक गावागावात लोकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात प्रशासन यशस्वी झाले. मतदारांना अनेक प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमामधून यामध्ये गृहभेटी, कोपरा बैठका, कलापथक, बॅनर व होर्डिंग, रॅली, मोबाईल ऑडीओ व टेक्स्ट संदेश, लाईट बीलावरील शिक्के, चित्ररथ आणि सामाजिक माध्यमांचा सुयोग्य वापर करुन मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. स्वीप समितीचे सदस्य सचिव डॉ.मोहित गर्ग यांच्या नियोजनातून जनजागृती कार्यक्रम यशस्वी झाला. शेख सिंह की म्हणाले माझ्याबरोबर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलेल्या आवहनाला मतदारांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तीनही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी  निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वी अंमलबजावणी करुन दाखविली त्यांचेही श्रेय मोठे आहे.
जिल्ह्यातील 4120 निवडणूक कर्मचारी, तेरा हजार पेक्षा जास्त पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक व मतदान केलेले 5,44,776 मतदार यांनी लोकशाहीचा उत्सव यशस्वी करुन दाखविला. पायी चालत काही बुथवर निवडणूक कर्मचारी व पोलीस दलाला पोहचावे लागले. यातून कोणताही मतदार आपल्या अधिकारापासून वंचित राहू नये हा प्रशासनाचा हेतू होता. जंगल परिसर, नक्षल प्रभाव, पाऊस, जंगली प्राणी या सर्व अडथळयांवर यशस्वी मात केल्यामुळेच आज आपण 70.26  सरासरी गाठली असे म्हणता येईल असे शेखर सिंह यांनी आभार मानताना वक्तव्य केले.
जिल्हयातील सर्व माध्यमांनी वेळोवेळी जनजागृती, विविध आकडेवारी, आयोगाच्या सुचना मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी चांगले कार्य केले त्याबद्दल माध्यमांचे आभार.

मतदार संघनिहाय टक्केवारी

आरमोरी -  72.13 टक्के
गडचिरोली - 68.54 टक्के
अहेरी -70.34 टक्के

सर्वात जास्त झाले या बूथवर मतदान

जिल्ह्यातील 932 बूथवर मतदान झालेच. परंतू यामध्ये सर्वात जास्त पहिले पाच बुथ - 1. आरमोरी-भगवानपुर-92.01टक्के, 2. आरमोरी-खेडेगाव-91.96 टक्के, 3.अहेरी-चिंतरेवला-91.77, 4.अहेरी-वेनलाया माल-89.78 टक्के 5. गडचिरोली-उमरी-89.14 टक्के 

तीन पैकी सर्वात जास्त टक्केवारी 72.13 सह आरमोरी विधानसभा क्षेत्रात 93527 पुरुष व 89059 स्त्रीयांनी मिळून एकूण182586 मतदान केले. 

महिलांचा विक्रमी सहभाग

जिल्हयात एकुण 263869 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरूषांपेक्षा जास्त मतदान केलेले पहिले पाच बुथची टक्केवारी - आरमोरी-खेडेगाव पु-91.41 टक्के तर म-92.52 टक्के , आरमोरी-सावली पु-80.46 तर म-91.45, अहेरी-मथुरानगर पु-81.23 तर म-90.30, आरमोरी-मोहगाव-पु-84.90 तर म-90.15, अहेरी-रामय्या पेठा-पु-80.39 तर म-89.07 टक्के.

 

1. जिल्हयात लोकशाही जिंकली असून नक्षलांच्या बहिष्कारावर मतदारांनी बॅलेटवर बटन दाबून उत्तर दिले. संपुर्ण जिल्हयात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्या. यासाठी प्रत्यक्ष बुथवर व दुर्गम भागात उभा असलेल्या आमच्या सुरक्षा दलाच्या जवानांचे आभार.
शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक

2. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मतदानाचा टक्का यावेळेस विक्रमी वाढला आहे. यासाठी सर्व मतदारांचे आभार. लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदारांबरोबर, निवडणूक कर्मचारी, पोलीस यांचेही विशेष आभार.
इंदूराणी जाखड, निवडणूक निर्णय अधिकारी, गडचिरोली 

3. दुर्गम भागात मतदान प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबविलेल्या मतदारांचे, सुरक्षा दलाचे व सर्वात सुंदर काम केलेल्या निवडणूक कर्मचा-यांचे आभार.
मनोज लोणारकर, निवडणूक निर्णय अधिकारी, अहेरी

4. जिल्हयात सर्वात जास्त मतदान आरमोरी क्षेत्रात झाले. यामागे मतदारांचे आभार. सर्व निवडणूक कर्मचारी यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. लोकशाहीच्या उत्सवात भाग घेतलेल्या सर्वांचे मी आभार मानतो.
विशाल मेश्राम, निवडणूक निर्णय अधिकारी, आरमोरी

6. निवडणुकीमध्ये कार्य केलेल्या शिपाई पासून ते जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या पर्यंत प्रत्येकाचे महत्वाचे होते. अशा प्रक्रियेत अतिशय गतिमानतेने कार्य केलेल्या सर्वच अधिकारी व कर्मचारी यांचे आभार. ख-या अर्थाने निवडणूक प्रक्रिया यशस्वी करून देणा-या मतदारांनी यावेळी जिल्हयाला महाराष्ट्रात दुस-या क्रमांकावर नेहून ठेवले.
कल्पना निळ-ठुबे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी

5. निवडणूक कर्मचारी यांची प्रतिक्रिया - निवडणूक कर्मचारी यांची प्रतिक्रिया - आम्ही जंगलातून 25 सुरक्षा रक्षक व स्थानिक 10 पोलीस यांच्या ताफ्यात अतिशय दुर्गम भागात चालत गोलो. यावेळी लोकशाहीसाठी आपण एक भाग आहोत याचा आनंद होता. ज्यावेळी आम्ही दुर्गम भागातील बुथवर 806 पैकी 624 मतदान यशस्वी केले तेव्ही आम्हाला आलेल्या अडचणींचा विसर पडला. कारण प्रशासनाने घेतलेली काळजी व पोलीसांनी दिलेली सुरक्षा यामुळे आम्ही सुखरूप व निश्चिंत जबाबदारी पेलून घरी परतलो.
डॉ. रूपेंद्रकुमार गौर - केंद्राध्यक्ष  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-23


Related Photos