गडचिरोलीत २०, आरमोरी आणि अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी १४ टेबल वरून मतमोजणी


- प्रशासनाकडून जय्यत तयारी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी /  गडचिरोली :
सोमवार २१ ऑक्टोंबर  रोजी मतदान पार पडल्यानंतर जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात मतमोजणीची जय्यत तयारी झाली असून उद्या २४ ऑक्टोंबरला  निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. गडचिरोलीत २०, आरमोरी आणि अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी १४ टेबल वरून मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. 
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३४६ मतदान केंद्र असून या  विधानसभा क्षेत्राची मतमोजणी गडचिरोली येथील शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी एकंदरीत २०  टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.  या विधानसभा क्षेत्रात  मतमोजणीसाठी जवळपास १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
 आरमोरी विधानसभा क्षेत्रात २९४ मतदान केंद्र असून या  विधानसभा क्षेत्राची मतमोजणी देसाईगंज येथील तहसील कार्यालयात होणार असून तमोजणीसाठी एकंदरीत १४ टेबल राहणार आहेत.
अहेरी विधानसभा क्षेत्राची  मतमोजणी नागेपल्ली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात होणार आहे. या विधानसभा क्षेत्रात एकंदरीत २९०  मतदान केंद्र असून १४ टेबलवरून निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
या तीनही मतमोजणी केंद्रांवर एकंदरीत ४०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. मतमोजणी केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
  गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्राच्या मतमोजणी कक्षात उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, पत्रकार यांना मोबाईल घेवून  जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पत्रकारांचे भ्रमणध्वनी संच मतमोजणी केंद्राच्या मिडिया सेलमध्ये जमा केल्यानंतरच त्यांना मतमोजणी कक्षात प्रवेश करता येणार आहे. मतमोजणी दरम्यान प्रत्येक फेरीचा निकाल मीडिया सेलमध्ये तसेच मतमोजणी केंद्रावर सांगण्यात येणार आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-23


Related Photos