परतीच्या पावसाने धान पीक जमीनदोस्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा धान उत्पादक म्हणून ओळखला जातो.  शेतकऱ्यांनी यावर्षी अतिवृष्टी, पुरपरिस्थितीचा तडाखा सहन करून जगविलेले धानपिक आता परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडले आहे. यामुळे धानपिक  जमीनदोस्त झाले असुन शेतकरी हवालदिल झाला आहे. 
 यावर्षी अनेकदा अतिवृष्टी व पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी तसेच रोवणी करून  धानपिक जगविले होते. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च सहन करावा लागला होता. अनेक शेतकऱ्यांनी बँकाकडून कर्ज घेतले होते. दरम्यानच्या  काळात समाधानकारक पाऊस पडल्याने हलके धानपिक परिपक्व होऊन कापणीस तयार झाले तर मध्यम व जड जातीचे धान  निसव्यावर आहे. या  धानपिकामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होण्याची आस लागली होती. मात्र अनेकदा निसर्ग शेतकऱ्यांचा पिच्छा करीतच असल्याचे दिसुन येते.  आता दिवाळीच्या पर्वावर शेतकऱ्यांनी हलके धान कापणीस प्रारंभ केला असतांना परतीच्या पावसाने कढोली परिसरास झोडपून काढण्यास प्रारंभ केला आहे.यामुळे कापलेल्या धानाच्या कडपा शेतातील पाण्यात सापडल्या आहेत.तर मध्यम व जड जातीचे धानपिक शेतातच आडवे पडले आहे. यामुळे एैन  सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या डोळयापुढे काळोख दाटुन आला आहे.निसर्गाच्या प्रकोपामुळे   शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला असुन आता शासनाकडे मदतीची आस लावून बसले आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-23


Related Photos