पुण्यात मुसळधार सुरु तर राज्यात तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता


वृत्तसंस्था / पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून थांबलेला पाऊस पुन्हा बरसण्यास सुरुवात झाली आहे.  आज पुणे आणि साताऱ्यात पावसाने हजेरी लावली. उद्या २३ ऑक्टोबर रोजी पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  विदर्भात बुलडाणा, गोंदिया आणि गडचिरोलीत आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं.
अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात २७ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं. उद्या २३ ऑक्टोबर रोजी पुणे, नगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता कश्यपी यांनी वर्तवली आहे. पुण्यात उद्या एक ते दीड तास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर २४ ऑक्टोबर रोजी पुण्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दिवाळीत म्हणजे २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. हवामानात बदल झाला तरच तुरळक सरी बरसतील. मात्र २८ ऑक्टोबर रोजी पुण्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं. कोकण आणि गोव्यात २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस पडणार असून सिंधुदुर्गातील काही भागात २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही बीडमध्ये उद्या काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा आंदाज आहे. २२, २३, २४ ऑक्टोबर रोजी उस्मानाबादेत काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मात्र २५ आणि २६ ऑक्टोबरनंतर मराठवाड्यातील पाऊस कमी होणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
 



  Print






News - Rajy | Posted : 2019-10-22






Related Photos