महत्वाच्या बातम्या

 निवडणुकीसाठी मतदान यंत्र सज्ज : जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत मशीन तयार करण्याची प्रक्रिया


- चंद्रपूर मतदारसंघात १९ हजार मतांचे मॉक पोल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे. याच अनुषंगाने मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सर्व विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. चंद्रपूर मतदारसंघातील ३८३ मतदान केंद्रासाठी मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत पार पडली. दोन दिवसांत संपूर्ण मशीन सज्ज करून चंद्रपूर येथे १९ हजार मतांचे मॉक पोलसुध्दा करण्यात आले.

१३- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात ११ आणि १२ एप्रिल रोजी घेण्यात आली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३८३ मतदान केंद्र आहेत. यासाठी ४७८ बॅलेट युनिट, ४७८ कंट्रोल युनीट आणि ५१३ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. मशीन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे एकूण 30 टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी याप्रमाणे एकूण ९० कर्मचा-यांमार्फत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसह मशीन सज्ज करण्यात आली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील ३८३ मतदान केंद्रासाठी असलेल्या ईव्हीएमपैकी ५ टक्के म्हणजे १९ मशीन मॉक पोलकरीता रॅन्डम पध्दतीने निवडण्यात आले. प्रत्येक मशीनवर १००० याप्रमाणे दोन दिवसांत १९ मशीनवर १९ हजार मॉक पोल घेण्यात आले.

अशी असते प्रक्रिया : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया ही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. यात मतपत्रिका बॅलेट युनीटला लावून सील करणे, प्रत्येक उमेदवाराला मतदान करून बघणे (मॉक पोल), मतदान झाल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आणि ईव्हीएम चा डाटा जुळवून बघणे. त्यानंतर कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट सील करून स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येते. प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान पथकाला मशीनचे वाटप केले जाते.

जिल्हाधिका-यांच्या समक्ष प्रक्रिया : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी स्वत: समेार मशीन तयार करण्याची प्रकिया करून घेतली. मशीनला व्यवस्थित सिलींग करणे जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तसेच मॉक पोल होतांना व्हीव्हीपॅट काम करते की नाही, याची काटेकोरपणे तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी रंजित यादव, सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos