आज देशभरातील बँकांमधल्या दोन संघटनांचे कर्मचारी संपावर


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : आज देशभरातील बँकांमधल्या दोन संघटनांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. तसेच दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर बँका चार दिवस बंद राहणार आहेत. या संपानं बँकिंगच्या सेवेवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. परंतु भारतीय स्टेट बँकेनं या संपात सहभाग घेतलेला नसून त्यांच्या कामकाजावर याचा परिणाम होणार नाही. कर्मचारी संघटनांनी संपाची घोषणा केल्यानं ऐन दिवाळीतच बँकिंग कामकाज करण्यात अडचणी येणार आहेत. अशातच लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या संपात काही संघटनांनी सहभाग न घेतल्यानं त्याचा संमिश्र प्रतिसादही पाहायला मिळेल. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ आणि बँक कर्मचारी फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी पुकारलेल्या या संपाला भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता संप झाल्यास 22 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील.
तर 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद राहील. त्यानंतर 27 ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. 27 ऑक्टोबर रोजी रविवार आहे. 28 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा (पाडवा) असल्याने देशाच्या विविध भागात बँका बंद राहतील. तर 29 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेनिमित्त बँकांचे कामकाज बंद राहील. योग्य नियोजन करून बँकांमधील कामकाज आटोपून घेताना सर्वसामान्यांची धावपळ होणार आहे.
अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (एआयबीईए) आणि बँक कर्मचारी फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांनी या संपाची घोषणा केली आहे. बँकांचं होऊ घातलेलं विलीनीकरण आणि बँकांनी घटवलेले व्याजदर या मुद्द्यांना विरोध करण्यासाठी हा संप पुकारला आहे. परंतु भारतीय स्टेट बँके(एसबीआय)नं या संपाचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचं सांगितलं आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र आणि सिंडिकेट बँकांसारख्या सरकारी बँकांवरही या संपाचा प्रभाव पडणार आहे. कारण या बँकांमध्ये या दोन्ही संघटनांचे कर्मचारी मोठ्या संख्येनं आहेत.

बँकिंग क्षेत्रातील सात संघटना या संपात सहभागी होणार नाहीत. या सात संघटनांमध्ये तीन कर्मचारी आणि चार अधिकाऱ्यांच्या संघटनांचा समावेश आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांनी 26 आणि 27 सप्टेंबरला संप पुकारला होता, परंतु त्यानंतर तो मागे घेण्यात आला.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन अधिकाऱ्यांसह अन्य बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी वित्त सचिवांची भेट घेतली होती. या बैठकीत बँकांचं विलीनीकरण, वेतन संशोधनासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. वित्त सचिवांनीही त्यांच्या मागण्या गांभीर्यानं घेतल्या असून, एक समिती बनवण्याचं आश्वासन दिलं, जी सर्वच महत्त्वाचे मुद्दे सोडवण्याचा विचार करेल. वित्त सचिवांनी बँक कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.  Print


News - World | Posted : 2019-10-22


Related Photos