नक्षलवादाला न जुमानता १३ किमीचा प्रवास करत वेंगनूरवासीयांनी बजावला मतदानाचा हक्क


-  गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने अतिदुर्गम व अतिसंवेदनशील  भागातील दाखविला लोकशाहीवर विश्वास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 नक्षलवाद्यांनी पोस्टर व बॅनर च्या माध्यमातून गडचिरोलीतील ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यामुळे  चामोर्शी तालुक्यातील  रेगडी  पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील  वेंगनूर येथील बूथ सुरक्षेच्या कारणास्तव  रेगडी येथे हलविण्यात आले. तरीही नक्षल्यांच्या आवाहनाला न जुमानता वेंगनूर वासियांनी १३ किमी जंगलातून प्रवास करून रेंगडी येथे मतदानाचा हक्क बजावला. यामुळे नक्षल्यांना चांगलीच चपराक बसली आहे. 
  नक्षलवाद्यांनी पोस्टर व बॅनर च्या माध्यमातून गडचिरोलीतील ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. वेंगनूर वासीयांनी नक्षलवाद्यांनी केलेल्या आवाहनाला न जुमानता उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत १३ किमीचा जंगलातून तसेच वाटेत येणाऱ्या कन्नमवार जलाशयाच्या नाल्यातून बोटीने प्रवास करत आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावत लोकशाहीवर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. यावेळी भावना व्यक्त करताना वेंगनूर येथील ग्रामस्थांनी आपला नेहमीच लोकशाहीला पाठिंबा असून नक्षलवाद्यांच्या भूलथापांना आपण कधीच बळी पडणार नसल्याचे सांगितले. यामध्ये महिला व वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता.
 गडचिरोली पोलिस दलातर्फे बुथवरच  रेगडी पोलीस मदत केंद्राचे चे प्रभारी अधिकारी  खापरे यांनी वेंगनूर  ग्रामस्थांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला.   नक्षलवाद्याना भीक न घालता वेंगनूर  येथील ग्रामस्थांनी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्याच्या कृतीचे  पोलीस अधीक्षक  शैलेश बलकवडे  यांनी कौतुक केले असून सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-21


Related Photos