भारतीय संस्कृती, ग्रामीण चालिरीती, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी २९ वर्षीय अंकीत अरोरा यांचे सायकलने भारतभ्रमण


- अंकीत अरोरा गडचिरोलीत दाखल
- पत्रकार परिषदेत सांगितले विविध अनुभव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
राजस्थान मधील अजमेर (जयपूर) येथील २९ वर्षीय अंकीत अरोरा हे जवळपास २६ महिन्यांपासून सायकलने भारतभ्रमण करीत आहे. या माध्यमातून ते भारतीय संस्कृती, बहुजनांचा अभ्यास, ग्रामीण चालिरीती, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, व्यसनमुक्त समाज व आदिवसी जीवनाचा अभ्यास करीत आहेत. नुकतेच १५ राज्यांचा सायकल दौरा करून ते गडचिरोली येथे दाखल झाले आहेत. 
अंकीत अरोरा यांच्या सायकल भ्रमणाबाबत श्री गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा भ्रष्टाचार निवारण समितीचे विश्वस्त डाॅ. एस.बी. कुंभारे यांनी पत्रकार आयोजित करून माहिती दिली. यावेळी अंकीत अरोरा यांनी आतापर्यंतच्या दौऱ्यादरम्यान आलेले अनुभव कथन केले. पत्रकार परिषदेला नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदिप कटकुरवार, खुशाल निकुरे उपस्थित होते. 
अंकीत अरोरा यांनी २७ ऑगस्ट २०१७ पासून सायकलने भारत भ्रमंती सुरू केली आहे. राजस्थानपासून त्यांनी आतापर्यंत दिल्ली, हिमाचल प्रदेश, लडाख, पंजाब, गुजरात, गोवा, तमिळनाडू अशा विविध १५ राज्यांमधील विविध गावांमध्ये, शहरांमध्ये त्यांनी दौरा केला. यानंतर मार्च २०१९ मध्ये ते राज्यात दाखल झाले. या काळात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये थांबून त्यांनी त्या - त्या गावातील संस्कृती, व्यवसाय, राहणीमान अशा अनेक गोष्टी जाणून घेतल्या आहेत. शेतकऱ्यांसोबत शेतीत काम सुद्धा केले आहे. 
काल १८ ऑक्टोबर रोजी अंकीत अरोरा हे गडचिरोली येथे पोहचले. वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सप्ताह सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी गुरूदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेला भेट दिली. गुरूदेव सेवा मंडळाच्या ध्यान, प्रार्थना, रामधुन, भजन या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधला. धानोरा तालुक्यातील मेंढालेखा, कुरखेडा तालुक्यातील आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेला भेट देउन त्यांची कार्यपध्दती त्यांनी जाणून घेतली.  उद्या रविवार २० ऑक्टोबर रोजी ते भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देणार आहेत. या ठिकाणी काही दिवस थांबून प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. त्यांच्या यात्रेला एकूण ७८० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अजून काही वर्षे संपूर्ण भारत भ्रमंतीला लागणार असल्याची माहिती अंकीत अरोरा यांनी दिली. 
अंकीत अरोरा यांनी बी काॅम पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी काही वर्षे नोकरी केल्यानंतर पत्रकारीताही केली. यानंतर त्यांनी भारत भ्रमंतीला सुरूवात केली. ते लांब पल्ला गाठण्यासाठी कधी - कधी एका दिवसात ३०० ते ४०० किमी सायकलने प्रवास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-19


Related Photos