निवडणुकीच्या कामात हयगय केल्याप्रकरणी विद्युत अभियंता निलंबीत


- स्थिर निगराणी पथकात पथकप्रमुख म्हणून होती नियुक्ती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा  :
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत अवैध वाहनांची वाहतूक, अवैध रोख रक्कम, बेकायदशीर दारू,संशयीत वस्तू किंवा शस्त्रात्रे, अवैदय साहित्याची वाहतूक  रोखण्यासाठी आणि या बाबींची पडताळणी करण्यासाठी  स्थिर निगराणी पथक तयार करण्यात आले आहे. खरबी येथील स्थिर निगराणी पथकात प्रथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेले भंडारा नगर परिषदेचे विदयुत अभियंता महेश दुपारे यांनी, त्यांच्या कामकाजात हयगय केल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे, विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत जिल्हयात स्थिर निगराणी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकाच्या प्रमुखांना निवडणूकीच्या कामामध्ये  त्यांचे काम जबाबदारीने पार पाडता यावे याकरिता शासनाच्या अधिसुचनेनुसार त्यांना कार्यकारी दंडाधिकारी या पदाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. भंडारा येथील नगर परिषदेत कार्यरत विदयुत अभियंता  महेश दुपारे यांची नियुक्ती खरबी चेकपोस्टच्या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्यांना या मार्गावरील वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थिती शिवाय वाहनांची तपासणी करता येत नाही.
भंडारा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी सदर चेकपोस्ट ला  24 सप्टेंबर ला भेट दिल्यावर त्या ठिकाणी पथक प्रमुख महेश दुपारे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यानंतर 28 सप्टेंबर ला पुन्हा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी दुस-यांदा दिलेल्या भेटी दरम्यान पथक प्रमुख आणि पथकातील इतर कर्मचारी कोणतेही वाहन न तपासता तंबूत आराम करीत असल्याचे आढळून आले. 15 ऑक्टोबर ला पुन्हा भेट दिल्यावर सुध्दा पथक प्रमुख गैरअसल्याचे आढळून आले. तसेच हजेरी नोंदवहीत  13 व 14 ऑक्टोबर रोजी त्यांची स्वाक्षरी नसल्याचे निदर्शनास  आले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी, पथक प्रमुख महेश दुपारे यांना विधानसभा निवडणूकीत नेमून देण्यात आलेल्या कामात  हयगय केल्याप्रकरणी तात्काळ निलंबीत केले आहे.
सदर अभियंत्यावर करण्यात आलेली कार्यवाही विभागीय नियम पुस्तीका, महाराष्ट्र नागरी सेवा (वतूर्णक) नियम व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 134 मधील तरतूदीनुसार करण्यात आली आहे.
  Print


News - Bhandara | Posted : 2019-10-18


Related Photos