आरमोरी परिसरातील संतप्त शेतकऱ्यांची इटियाडोह कार्यालयावर धडक


-‌ पाणी पुरवठ्या अभावी  धान  पिक करपले
-‌ इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
‌तालुका प्रतिनिधी  / आरमोरी :
तालुक्यातील आरमोरी परिसरातील अरसोडा, वघाळा ,सायगाव, शिवानी ,आष्टा ,अंतरजी, मुलुरचक, कासवी, व आरमोरी परिसरात धानपिकाची लागवड करण्यात आली. मागील पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने व धान पिक गर्भावस्थेत असल्याने सध्या धान पिकाला पाण्याची नितांत आवश्यकता आहे . या परिसरातील शेतकऱ्यांनी इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी मागील दहा दिवसापासून इटियाडोह प्रकल्प कार्यालयाकडे केली होती .परंतु इटियाडोह   प्रकल्प कार्यालयाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने  संतप्त झालेल्या आरमोरी परिसरातील दहा गावातील शेतकऱ्यांनी इटियाडोह कार्यालयावर आज धडक दिली.
‌आरमोरी परिसरातील या दहा गावांना इटियाडोह धरणातून परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिल्या जाते. या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने इटियाडोह धरण पूर्णपणे १०० टक्के   भरलेला आहे .सध्या या परिसरातील शेतकऱ्यांचे धान पीक पूर्णपणे गर्भावस्थेत असून ,या धान पिकाला पाणी न मिळाल्यास उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण होऊन पिके करपून जाऊ शकतात . याबाबत आरमोरी तालुक्यातील  सातही पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शेतकऱ्यांनी दिनांक चार ऑक्‍टोबरला धरणाचे पाणी तात्काळ सोडण्यात यावे या मागणीसाठी उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते .परंतु दहा ते पंधरा दिवस लोटूनही सदर अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले व वारंवार सूचना व निवेदन देऊन पाण्याच्या गंभीर बाबीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आरमोरी परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी आरमोरीच्या  इटियाडोह प्रकल्प कार्यालयावर धडक दिली .अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुडे शेतकऱ्यांचे हाल होत आहे .त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे . येत्या दोन-तीन दिवसात धरणाचे पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी अशोक भोयर, मनोहर खेडकर, दिलीप चौधरी, नामदेवराव सोरते ,देवराव मेश्राम ,बाळकृष्ण मोटघरे ,प्रभाकर मोटघरे ,सुनील प्रधान, वसंत धोटे ,मनोहर खरकाटे ,गोविंदा कुकडकर ,अभिमन्यू धोटे, लालाजी धोटे ,नीलकंठ कोडप,गोपाल मुरवत कार, उरकुडा नैताम, ऋषी वाघाडे, लक्ष्मण बारापात्रे ,धनंजय बनसोड,यासहित शेकडो शेतकरी उपस्थित होते.
‌याबाबत आरमोरी येथील इटियाडोह प्रकल्प कार्यालयाला भेट दिली असता एक येथील शाखाधिकारी मागील पंधरा दिवसापासून हजर नसल्याचे एका कर्मचाऱ्यांनी सांगितले. सदर अधिकाऱ्याकडे तीन ठिकाणचा कारभार असून सध्या ते निवडणूक कामात व्यस्त असल्याचे सांगितले. याबाबत आरमोरी येथील इटियाडोह प्रकल्प कार्यालयाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चापले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, आरमोरी येथील पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी दिनांक 5 ऑक्टोंबर ला माझ्याकडे पाणी सोडण्याबाबत अर्ज दिले होते याबाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी कळविले आहे .
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-17


Related Photos