महत्वाच्या बातम्या

 मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला यंत्रणेचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८- वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था व पोलीस निवडणूक निरीक्षक बरिंदरजीत सिंह यांनी आज निवडणूक यंत्रणेसाठी नियुक्त नोडल अधिकारी यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी जिल्ह्यातील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला व पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त केले. सर्व उमेदवारांना समान वागणूक द्यावी. निष्पक्षपणे, निर्भयपणे निवडणुकीचे कामे करावे. निवडणूक हा एक लोकशाहीचा उत्सव आहे. त्यामुळे सर्वांनी मन लावून कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पोलीस निवडणूक निरीक्षक बरिंदरजीत सिंह म्हणाले, मुख्य निवडणूक कार्यालयाकडून आलेल्या माहितींबाबत अद्ययावत रहावे. नोडल अधिकाऱ्यांनी सविस्तर वाचन करुन दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे काम करावे. निवडणूक कामांमध्ये कार्यरत पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावावे. स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.) व फिरते पथक (एफ.एस.टी.) यांनी सजग राहून काम करावे. ईव्हीएमची सुरक्षा महत्वपूर्ण असून त्याकडे लक्ष देण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या व निष्पक्ष व निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन यावेळी केले.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी निवडणूक यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारीचा, घेतलेल्या प्रशिक्षणाचा, उपलब्ध मनुष्यबळाचा तसेच पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या पोलीस दलाच्या मनुष्यबळाचे व्यवस्थापन आणि तपासणीसाठी गठीत पथकांची माहिती यावेळी सादर केली.

मतदान प्रक्रियेमध्ये ८५ पेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग आणि घरी जाऊन मतदान करण्याच्या व्यवस्थेबाबत त्यांनी माहिती घेतली. घरी जाऊन मतदान घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने व गुप्ततेने मतदान प्रक्रिया पार पाडावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

यावेळी वर्धेचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, देवळीच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार, आर्वीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, हिंगणघाटच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, मोर्शीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, धामणगाव (रेल्वे) सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांच्यासह विविध नोडल अधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos