महत्वाच्या बातम्या

 १ हजार ३०१ मतदार करणार गृहमतदान


- मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये पहिल्यांदाच, ८५ वर्षांवरील नागरिक तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ११- भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातील भंडारा जिल्ह्यात एकूण १ हजार ३०१ नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली असून यात ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १ हजार ५६ आणि दिव्यांग मतदारांची संख्या २४५ आहे.

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. भारत निवडणूक आयोगाने सुद्धा पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील नागरीक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग बांधवांना गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे इच्छुक मतदारांना नमुना १२- डी देण्यात आला. 

मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या सुचना : गृहमतदानासंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच नियोजन भवन येथे घेण्यात आले. यात फॉर्म १३ - ए (डिक्लरेशन), फॉर्म १३- बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म १३- सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म १३-डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. अतिशय अचूक पध्दतीने गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडायची असून त्याची गोपनीयता सुद्धा पाळणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणामध्ये सांगण्यात आले. प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर तसेच आणि नोडल अधिकारी, प्रशिक्षण लीना फलके, नोडल अधिकारी रोहिणी पाठराबे उपस्थित होते.

अशी राहील प्रक्रिया : गृहमतदानासाठी घरी जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डिक्लेरेशन म्हणजे फॉर्म १३- ए अचूक भरून घ्यावयाचे आहे. मतदान केलेल्या पत्रिकेची उभी घडी करून सदर पत्रिका छोटा लिफाफा म्हणजे फॉर्म १३- बी मध्ये टाकावा. डिक्लरेशन आणि छोटा लिफाफा दोन्ही कव्हर बी लिफाफा म्हणजेच फॉर्म १३- सी मध्ये टाकावा. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गृह मतदानाची व्हीडीयोग्राफी करण्यात येणार असून दोन अधिकारी / कर्मचारी, मायक्रो निरीक्षक आणि व्हीडीओग्राफर सोबत राहणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos