ग्रामरोजगार सेवकांचे थकीत मानधन द्या, अन्यथा विधानसभा निवडणूकीवर सहकुटूंब बहिष्कार टाकणार


- ग्रामरोजगार सेवकांचा पत्रकार परिषदेतून इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात महारात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोगजगार योजनेत कार्यरत असलेल्या जवळपास ४५७ ग्रामरोजगार सेवकांचे मानधन थकीत असल्यामुळे दिवाळी अंधारात जाण्याची पाळी आली आहे. यामुळे थकीत मानधन विधानसभा निवडणूक व दिवाळी आधी देण्यात न आल्यास विधानसभा निवडणूकीवर सहकुटूंब बहिष्कार टाकून मतदान करणार नाही तसेच दिवाळीनंतर आमरण उपोषण करू, रोहयोच्या कामांवर पूर्णपणे बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामरोजगार सेवकांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता २००५ मध्ये ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामरोजगार सेवकांना कामानुसार २.२५  टक्के इतके कमिशन देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. तसेच दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मानधन देण्याचे निश्चित आहे. ग्रामरोजगार सेवक हा मजूर व प्रशासनातील दुवा म्हणून काम करतो. मात्र मागील ७ ते १४ महिन्यांचे मानधन शासनाकडे थकीत आहे. यामुळे दिवाळी सणाच्या तोंडावर आर्थिक संकट कोसळले आहे.
जिल्ह्यातील आरमोरी आणि कुरखेडा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे १४ महिन्यांचे मानधन थकीत आहे. गडचिरोली, कोरची, चामोर्शी या तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे ७ महिन्यांचे, धानोरा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे ५ महिन्यांचे, भामरागड तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे १० महिन्यांचे, देसाईगंज तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे ४ महिन्यांचे व मुलचेरा, एटापल्ली आणि सिरोंचा तालुक्यातील ग्रामरोतजगार सेवकांचे ८ महिन्यांचे मानधन थकीत आहे. तसेच प्रवास भत्ता आणि अल्पोपहार भत्तासुध्दा थकविण्यात आला आहे. काही तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना प्रवास व अल्पोपहार भत्ता देण्यातच आला नाही. 
मानधनासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु अद्यापही प्रशासनाने तोडगा काढलेला नाही. यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या ग्रामरोजगार सेवकांनी विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच दिवाळीपूर्वी मानधन न मिळाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असेही ग्रामरोजगार सेवकांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेला ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बोहरे, हिराजी राउत, राजु मुनघाटे, जालंधर बोदेले, ओमप्रकाश सहारे, दीपक प्रधान, विलास ठाकरे, चंद्रशेखर मेश्राम, रविंद्र मारगाये, सत्वशिल खोब्रागडे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-16


Related Photos