इंजेवारी व पेठतूकूम येथील महिला म्हणताहेत, 'मत मागायला या, पण दारूबंदीची हमी द्या'


 - दारुमुक्त निवडणुकीसाठी आक्रमक भूमिका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
कित्येक दिवसांपासून आम्ही गावातील दारूविक्री पूर्णतः बंद व्हावी यासाठी जिवाचं रान करीत आहो. अनेकांवर कारवाई झाली पण विक्रेते चोरून लपून विकत आहेत. निवडणुकीच्या काळात तर त्यांना जास्त जोर येईल. त्यामुळे प्रचारसाठी या पण दारूबंदीची हमी द्या अशी रोखठोक मागणी तालुक्यातील इंजेवारी व पेठतूकूम येथील महिलांनी उमेदवारांना केली आहे.
इंजेवारी आणि पेठतूकूम या दोन्ही गावांमध्ये वर्षभरापूर्वी मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने दारूविक्री बंदीचा ठराव झाला. विक्रेत्यांना नोटिस देण्यात आले. सातत्याने अहिंसक कृती करून महिलांनी दारूचे साठे नष्ट केले. विक्रेत्यांविरोधात तक्रारी झाल्या. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी दारूविक्री बंद राहिली. गावात शांतता नांदायला लागली. पण गत सहा महिन्यांपासून पुन्हा दारू विक्रेत्यांनी डोके वर काढले. चोरून लपून दारूची विक्री सुरू झाली. गावातील दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी महिलांनी सातत्याने केली. पण त्याचाही विशेष फायदा झाला नाही.
महिला दारूविक्री होऊ न देण्यासाठी भक्कमपणे उभ्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. या काळात गावात चोरून लपून दारू येण्याची शक्यता आहे. मतदारांना दारूचे आमिष दाखवून त्यांचे मत विकत घेण्याचा प्रकारही घडू शकतो. असे झाल्यास वर्षभर महिलांनी केलेले कष्ट वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणूक दारूमुक्त होण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा करण्यासाठी पेठतूकुम येथे महिलांची संयुक्त बैठक मुक्तिपथ तालुका चमूने घेतली. प्रचारासाठी येणार्‍या उमेदवारांनी मत मागायच्या आधी दारूबंदीची हमी द्यावी अशी भूमिका महिलांनी मांडली. आमच्या नवर्‍यांना दारू पाजणार्‍या उमेदवारांना नक्कीच पाडू असा विशासही महिलांनी व्यक्त केला.  

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-15


Related Photos