महत्वाच्या बातम्या

 मतदार जनजागृतीसाठी जिल्ह्यातील १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी लिहिले नातेवाईकांना पत्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या १ लाख ४ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी नातेवाईकांना स्वत:च्या हस्त अक्षरात पत्र लिहिले असून त्यावरती पालकांची स्वाक्षरी घेवून त्याबाबतची नोंद शाळा दप्तरी ठेवण्यात आली आहे.

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १ हजार ४६९ शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून सेलू तालुक्यातील १५४ शाळा, आर्वी तालुक्यातील २०९ शाळा, हिंगणघाट तालुक्यातील २२२ शाळा, कारंजा (घा.) तालुक्यातील १२४ शाळा, समुद्रपूर तालुक्यातील १९७ शाळा, आष्टी तालुक्यातील ९१ शाळा,  वर्धा तालुक्यातील २९५ शाळा व देवळी तालुक्यातील १७७ शाळांचा यामध्ये समावेश होता.

भारतीय राज्यघटनेने १८ वर्षावरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे हे कर्तव्य बजावत असतांना सुजाण नागरिक म्हणून निवडणुकीत मतदान करा. लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी तसेच भविष्याच्या पिढीसाठी आपले मत मौल्यवान आहे. निवडणुकीत मतदान करताना कोणत्याही दबावाला, अमिषाला बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावावा, अशा आशयाचे पत्र शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांना लिहिले आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी उत्तम खरात यांनी दिली.





  Print






News - Wardha




Related Photos