तळोधी विज वितरण केंद्रातील लाचखोर लाईनमन, मजुरास अटक


- विद्युत चोरी करणाऱ्यावर कारवाई न करण्यासाठी घेतली सहा हजारांची लाच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  एकाच विज मिटरवर दोन पाण्याच्या मोटारी लावुन विद्युत चोरी केल्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी ८ हजार रूपयांची मागणी करून मजुराकरवी ६ हजार रूपये स्वीकारणारा तळोधी विज वितरण केंद्रातील लाईनमन व मजुरास अटक करण्यात आल्याची घटना आज १२ ऑक्टोबर रोजी घडली.  लाईनमन मोरेश्वर  प्रभाकर आसुटकर (३२) , मजुर सुरज डोका सातपुते (२३) रा. कुरूड अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार चामोर्शी तालुक्यातील पोर नदीमधून  शेतीकरीता पाणी घेण्यासाठी एकाच मिटरवरून दोन पाण्याच्या मोटार लावून विज चोरी केल्या प्रकरणी तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी  तळोधी विज वितरण केंद्रात कार्यरत लाईनमन मोरेश्वर आसुटकर याने तक्रारदारास ८ हजार रूपयांची मागणी केली. मात्र ही रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने तक्रारदाराने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहनिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  आज लावलेल्या सापळ्यादरम्यान लाईनमन आसुटकर याने पंचासमक्ष ८ हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती  मजुर सुरज सातपुते याच्याहस्ते सहा हजारांची लाच स्वीकारली.यावरून दोघांनाही अटक करून त्यांच्याविरूद्ध चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  ही कारवाई वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक यशवंत राऊत  व कर्मचाऱ्यांनी केली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-12


Related Photos