महत्वाच्या बातम्या

 राज्यावरून कापड येणार कापून : गावातील महिला देणार शिवून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / यवतमाळ : जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात राज्यातील ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश शिवून मिळणार आहेत. त्यासाठी राज्य स्तरावरून ठराविक मापात कापलेला कापड पुरविला जाणार असून गावातील बचत गटाच्या महिला हा गणवेश शिवून शाळांपर्यंत पोहोचविणार आहेत. याबाबतचा कार्यारंभ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आला आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याबाबत परिषदेमार्फत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून मे. पद्मचंद मिलापचंद जैन यांना ४ मार्च रोजी ४४ लाख ६० हजार ४ विद्यार्थ्यांसाठी कापड पुरवठ्याचा आदेश देण्यात आला आहे. हा कापड पुरविल्यानंतर गावपातळीवरील महिला बचत गटामार्फत गणवेशाची शिलाई केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, कापड पुरवठादार प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बीआरसी, सीआरसीपर्यंत कापड पुरविणार आहे. या कापडाच्या बाॅक्सला केंद्र सरकारच्या टेक्स्टाईल कमिटीचे सील असेल.

६४ बाॅक्समध्ये येणार कापड : 
प्रत्येक बीआरसी, सीआरसी केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ६४ स्वतंत्र बाॅक्स उपलब्ध होतील. प्रत्येक बाॅक्समध्ये १०० गणवेशाच्या कापडाचे तुकडे (मायक्रो कटिंग केलेले) असतील.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी चार आणि प्रत्येक विद्यार्थिनीसाठी चार बाॅक्समध्ये हे कापडाचे तुकडे असतील. त्या तुकड्यांमधून बचत गटांना एक गणवेश तयार करून द्यायचा आहे. गणवेश शिवण्यापूर्वी महिला शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची मापे स्टँडर्ड मापानुसार आहेत की नाही, याची खात्री करतील.

त्रुटी आढळल्यास दुरुस्ती : 
- शिवून तयार झालेल्या गणवेशाचा पुरवठा बचत गटामार्फत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत करण्यात येणार आहे.
- शिलाईत त्रुटी आढळल्यास बचत गटामार्फतच दुरुस्ती केली जाणार आहे.

असा असेल गणवेश : 
- २०२४-२५ या सत्राकरिता दोन गणवेश पुरविले जाणार आहेत.
- यात एक गणवेश नियमित तर दुसरा स्काउट गाईडचा असेल.
- नियमित गणवेशामध्ये मुलांसाठी आकाशी शर्ट व गडद निळ्या रंगाची पँट.
- मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असेल.
- आठवीच्या विद्यार्थिनीसाठी ओढणीसाठीही कापड पुरविला जाणार आहे.

मोबदला ११० रुपये : 
प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या गणवेशासाठी किती कापड लागेल, याची मागणी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदविली जाईल. जेवढे गणवेश द्यायचे आहेत, तेवढे कापड ठराविक (स्टँडर्ड) मापानुसार कापून (मायक्रो कटिंग करून) पुरवठा केला जाईल. एक गणवेश शिवून देण्यासाठी बचत गटांना ११० रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos