महत्वाच्या बातम्या

 शांततापूर्ण व निर्भय  निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांनी आज ११ भंडारा- गोंदिया लोकसभा  मतदारसंघाच्या निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्यासोबत गोंदिया जिल्हाधिकारी प्रजीत नायर व पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
आज सकाळी चोकलिंगम यांनी गोपेवाडा आणि पलाडी येथील प्रस्तावित मतमोजणी व्यवस्था केलेल्या केंद्रांना भेट देऊन  व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी कार्यकारी अभियंता पराग ठमके, जिल्हा पुरवठा अधिकारीवंजारी यांच्या सह पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील  नियंत्रण कक्षातील विविध कक्षांना त्यांनी भेट देऊन कामाची माहिती घेतली .

यावेळी आदर्श आचारसंहिता कक्ष, १९५० हेल्पलाइन नंबर, तसेच नियंत्रण कक्षातील स्थानिक संपर्क क्रमांक याबाबत व अन्य दैनंदिन निवडणूक विषयक कामाची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे यांनी त्यांना दिली. सि- व्हिजिल ॲपवरील येणाऱ्या तक्रारींचे निराकरण दिलेल्या वेळेतच करावे , कक्षाच्या विविध कामांवर संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सनियंत्रण ठेवावे. खर्च खर्च समितीने रोज आलेल्या खर्चांवरती नजर ठेवून अहवाल आयोगास विहित वेळेत सादर करावे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कक्षांची पाहणी त्यांनी यावेळी केली.

त्यानंतर झालेल्या आढावा  बैठकीत ११, भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी केलेल्या पूर्वतयारीमध्ये प्रामुख्याने मनुष्यबळ व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, खर्च नियंत्रण पथक ,सहाय्यक मतदान केंद्र, मतदान केंद्रावरील दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, निवडणूक कार्यासाठीचे  आवश्यक प्रशिक्षण, निवडणूक कार्यासाठीचे साहित्य भंडारा -गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भाग व तेथील संवाद व्यवस्था तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या निधीची मागणी करण्याबाबत त्यांनी सूचित केले .

निवडणूक कार्याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या विविध पुस्तिका प्राप्त करून घेऊन त्या संबंधितांपर्यंत पाठवाव्यात  असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
पोस्टल बॅलेट, जिल्हा निवडणूक आराखडा ,तसेच संपर्क व्यवस्था नसलेल्या ठिकाणी करण्यात आलेल्या पर्यायी संपर्क व्यवस्थेबाबतही त्यांनी आढावा घेतला.

मतदार जागृतीसोबतच नोटा याबाबत देखील नागरिकांना माहिती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तृतीयपंथीय मतदारांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग जिल्हा प्रशासनाने आश्वस्त करावा. ज्या  मतदान केंद्रावरील मतदानाचे प्रमाण कमी आहे, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार विषयक जनजागृती करावी.

खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत मतदानासाठी प्रवृत्त करावे तसेच तेथील कार्यरत कामगारांना मतदानासाठी पगारी सुटी मिळेल याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी आस्थापनांची बैठक घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रावरील वेबकास्टिंग विषय नियुक्त चमुचे सनियंत्रण वेळोवेळी करण्यात यावे, तसेच निवडणुकीदरम्यान नगदी रक्कम तसेच मतदारांना आमिष दाखवण्यासाठी करण्यात येणाऱ्या बाबींच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी भंडारा कुंभेजकर यांनी संगणकीय सादरीकरण करून जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा त्यांना दिला.

निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी लोकशाहीला बळकट करण्यासाठी सेवा करण्याची ही संधी असून या संधीचा उपयोग करून लोकशाही प्रक्रिया बळकट करावी  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.





  Print






News - Bhandara




Related Photos