सुक्ष्म निरीक्षकांचे कार्य निवडणुक प्रक्रियेत महत्त्वाचे : प्रविण गुप्ता


- निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
मतदान प्रक्रिया यशस्वी करण्यामागे निवडणूक अधिकारी,  कर्मचारी यांचे कार्य महत्त्वाचे असून सुक्ष्म निरीक्षकांचे निरीक्षण त्यासाठी गरजेचे आहे असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक प्रविण गुप्ता यांनी केले. आज जिल्हास्तरीय सुक्ष्म निरीक्षकांच्या प्रशिक्षणात ते  मार्गदर्शन करत होते. त्यांच्या सोबत यावेळी आर.एस. धिल्लन, व्ही.आर.के. तेजा व जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते.
जिल्हास्तरीय प्रशिक्षणात यावेळी जिल्ह्यातील सुक्ष्म निरीक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांना निवडणूक प्रक्रियेतील विषयांबाबत सखोल माहिती देण्यात आली. प्रत्येक सहा मतदान बुथ मागे एक सुक्ष्म निरीक्षक असणार आहे. त्या सहाही मतदान बुथवर सर्व प्रक्रियेवरती निरीक्षकाचे कार्य असणार आहे.
या प्रशिक्षणात  शेखर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे सुक्ष्म निरीक्षकांची कार्य, संनियंत्रण पद्धती, अडचणी आल्यास करावयाच्या उपाययोजना तसेच मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे सांगितले. प्रविण गुप्ता, आर.एस. धिल्लन व व्ही आरे.के. तेजा यांनी यावेळी उपस्थितांना विविध प्रश्न विचारुन प्रशिक्षणातील विषयांबाबत पडताळणी केली. यामुळे सुक्ष्म पातळीवरती विविध विषयांबाबत यावेळी चर्चा झाली. मतदान यादीत नाव नसेल, वेळेनंतर आलेल्या मतदारांचे काय?  मतदान केंद्रात प्रवेश कोणकोणाला? अशा विविध बाबींवर यावेळी त्यांची चर्चा झाली. सुक्ष्म निरीक्षक यांना दिलेल्या मतदान बुथवर जावून सर्व पाहणी करुन त्यांचा अहवाल तासातासाला मुख्य निरीक्षक व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना द्यावे असे प्रविण गुप्ता यांनी सांगितले. या प्रशिक्षणात यावेळी महेश पाटील यांनीही मार्गदर्शन केले तर कल्पना निळ-ठुबे यांनी उपस्थितांना पोस्टल बॅलेट बद्दल माहिती दिली.
नव्याने आयोगाकडून अंतिम झालेली मतदार यादी सर्वांना बंधनकारक असेल. जुन्या याद्या याबरोबर कालबाहय होणार आहेत. त्यामुळे नवीन यादीत नाव असलेलेच मतदार मतदान करण्यास पात्र असतील. नाव नसलेल्या मतदारांना मतदान करण्यास मिळणार नाही. मतदारांनी आपले नाव voter helpline या ॲपवर, तसेच १९५० या हेल्पलाईनवर तपासून मतदान करावे. तसेच लवकरच निवडणूक यंत्रणेकडून त्यांची नावे असलेली  मतदान स्लीप दिली जाणार आहे असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात राबविले जाणार मतदार स्वाक्षरी अभियान : जिल्ह्यात मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध नाविन्यपुर्ण उपक्रमांची मदत घेतली जात आहे. यामध्ये आज जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करुन अभियानास सुरुवात केली गेली. या स्वाक्षरी अभियानात जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी फलक लावून मतदारांकडून मतदान करण्यासाठी तयार आहोत या उद्देशाने स्वाक्षरी घेतली जाणार आहे. यामध्ये मोठया आकारात बॅनर तयार केले आहेत. एक फलकावर हजारो सह्या होतील अशा पद्धतीचे हे बॅनर तयार करण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी सेल्फी पाँईटला ही भेट दिली व निवडणूक निरीक्षक यांनी सेल्फी काढला. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-11


Related Photos