भारताची बॉक्सिंगपटू मेरी कोमची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भारताची अव्वल बॉक्सिंगपटू मेरी कोम हिने आज  जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेरी कोमने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या इंग्रीत व्हॅलेन्सिया हिला ५-० असे चीतपट केले. या विजयासह मेरी कोमने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील आपले आठवे पदक निश्चित केले आहे.
यापूर्वी मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात सहा सुवर्णपदके आणि सहा रौप्यपदके जिंकली आहेत. मात्र, मेरी कोम यंदा पहिल्यांदाच ५१ किलो वजनी गटातून खेळत आहे. 
उपांत्य फेरीत मेरी कोम हिच्यासमोर द्वितीय मानांकित टर्क बुसेनाझ कॅगिरोगलू हिचे कडवे आव्हान असेल. नुकत्याच झालेल्या युरोपियन बॉक्सिंग स्पर्धेचे विजेतेपद तिने मिळवले होते. त्यामुळे उपांत्य फेरीत काय होणार, याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागली आहे.
तर दुसरीकडे भारताच्या लवलीना बोरगोहेन हिनेदेखील ६९ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिने मोरक्कोच्या बेल अहिबिब हिचा ५-० असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिला बेलारुसच्या यूलिया अपानासोविच हिच्याविरुद्ध लढत द्यावी लागेल.

   Print


News - World | Posted : 2019-10-10


Related Photos