पळसगाव येथे दसर्‍याला महिलांनी केलेले दारूचे दहन


-  ५० हजाराचा साठा नष्ट : गावकर्‍यांनी दिल्या दारुमुक्त निवडणुकीच्या घोषणा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
दसर्‍याला रावण दहनाची परंपरा अनेक गावांमध्ये सुरू आहे. पण तालुक्यातील पळसगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिला व गावकर्‍यांनी जंगलशिवारात सापडलेल्या दारूचे दहन करून दसरा साजरा केला. देशी दारूचा ५० हजाराचा साठा यावेळी नष्ट केला. दारूमुक्त निवडणुकीच्या घोषणाही गाव संघटनेच्या महिलांनी दिल्या. 
दसर्‍याच्या दिवशी सकाळपासूनच पळसगाव मध्ये सणाची लगबग सुरू होती. रावणदहनाचे नियोजन सुरू होते. महिला स्वयंपाकाची तयारी करीत होत्या. याच दरम्यान पळसगाव – मोहटोला मार्गावर किन्नाळा परिसरातील जंगलात देशी दारूचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. सणाची तयारी व स्वयंपाक अर्धवट ठेवून १५ ते २० महिला व काही पुरुष किन्नाळा जंगलाकडे निघाले. सर्वांनी जंगलात शोधाशोध सुरू केली. या शोधमोहिमेत जमिनीखाली लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या पाच पेट्या सापडल्या. या सर्व पेट्या त्यांनी गावात आणल्या. मुक्तिपथ तालुका चमुलाही याची माहिती दिली. गावात रावणदहनाची तयारी सुरू होती. प्रतिकात्मक रावण दहन करण्यापेक्षा आपण या दारूच्या रावणाचेच दहन करू असा विचार पुढे आला. सायंकाळी सर्वांनी ठरलेल्या जागी गर्दी केली. मोठ्या संख्येने गावातील महिला उपस्थित होत्या. आणलेला सर्व साठा जाळून लोकांनी खर्‍या अर्थाने दसरा साजरा केला. गावातील दारू अशीच पूर्णतः नष्ट व्हावी अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली.

महिलांच्या घोषणांनी परिसर दणाणला

निवडणुकीचे वारे वाहत आहेत. दारूमुक्त निवडणूक करण्याचा निर्धार गावाने केला आहे. हाच निर्धार महिलांनी दारूच्या राक्षसाचे दहन करताना घोषणा देत व्यक्त केला. जो पाजील माझ्या नवर्‍याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू, ज्याला दारूबंदी नको, तो आमदार आम्हाला नको, जर व्हायचे असेल आमदार तर दारूबंदीला समर्थन द्यावेच लागेल, ही निवडणूक दारूमुक्त निवडणूक यासह इतरही घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. काहीच दिवसांपूर्वी येथील महिलांनी गावात रॅली काढून दारूमुक्त निवडणुकीसाठी जनजागृती केली. निवडणूक काळात गावात दारू येऊन देणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार असल्याचेही महिलांनी सांगितले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-10


Related Photos