जियोने कॉलिंग पॉलिसी बदलली, प्रति मिनिटाला ६ पैसे द्यावे लागणार


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   जियोने आपली कॉलिंग पॉलिसी बदलली आहे. नवीन नियमांनुसार आता जियोवरून फोन करणाऱ्या युझर्सला आता प्रति मिनिटाला ६ पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळे  सणासुदीच्या काळात  जियोवरून आपल्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना आणि पाठीराख्यांना शुभेच्छांचा कॉल करण्याचा विचार करत असाल तर विचारच करायला हवा.  याआधी ही सेवा जियोकडून फुकटात मिळत होती.
ट्रायने  २०१७ मध्ये इंटरकनेक्ट युसेज चार्ज (आययूसी) १४ पैशांवरून  ६  पैसे प्रति मिनिट केले होते. ट्रायकडून 'कॉल टर्मिनेशन चार्ज'बाबत नव्याने विचारविनियम सुरू असतानाच मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियोने बुधवारी युझर्सला तगडा धक्का दिला. जियो नेटवर्कवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आता युझर्सला नवीन नियमानुसार पैसे द्यावे लागणार आहे. जियोने याबाबत एक पत्रक काढून माहिती दिली आहे.
जियो कंपनीच्या सिमकार्डवरून दुसऱ्या कंपनीच्या सिमकार्डवर फोन केल्यास प्रति मिनिटाला ६ पैसे द्यावे लागणार आहेत. याची भरपाई कंपनी तेवढ्याच पैशात फुकटात इंटरनेट डाटा देऊन करणार आहे, अशी माहिती जियो कंपनीकडून देण्यात आली आहे. फक्त जियो फोन किंवा लँडलाईनवर जियो सिमकार्डवरून फुकटात कॉलिंग सेवा देण्यात येणार आहे. तसेच व्हॉट्सॲप, फेस टाईम आणि अन्य ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या फोन कॉलवरही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच इन्कमिग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत असणार आहे, अशीही माहिती कंपनीने दिली आहे.
 दरम्यान, जियोवरून व्हाईस कॉलिंग सेवा फुकटात देण्यात येत असल्याने कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या अर्थात भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना ट्रायच्या नियमानुसार १३, ५०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागत होती. ट्रायच्या नियमांपासून वाचण्यासाठी जियोने आता अन्य नेटवर्कवर कॉलिंग सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे.

   Print


News - World | Posted : 2019-10-10


Related Photos