सोने खरेदीदारांना खुशखबर, केंद्र सरकार ११ ऑक्टोबरपर्यंत स्वस्तात सोने विकणार


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :    नवरात्री , दसरा आणि दिवाळी मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सोनेखरेदी करतात. त्यासाठी केंद्र सरकारने सोने खरेदीदारांना खुशखबर दिली आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर सरकारने सोनेविक्रीसाठी नवीन बाँड बाजारात आणले आहेत. सॉवरेन गोल्ड बाँड २०१९ - २० मध्ये गुतंवणूक करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.
७ ऑक्टोबरला ही योजना सुरू झाली असून ११ ऑक्टोबरपर्यंत या योजनेत सोनेखरेदी करता येणार आहे. सर्वसामान्यांना सोने खरेदी करता यावी, यासाठी मोदी सरकारने पाचव्यांदा ही योजना आणली आहे. या गोल्ड बाँडची किंमत ३,७८८  रुपये प्रतिग्रॅम ठेवण्यात आली आहे.
या योजनेत ऑनलाईन गुतंवणूक केल्यास ५० रुपये प्रतिग्रॅमची सूटही मिळणार आहे. ऑनलाईनवर हे बाँड ३,७३८  रुपये प्रतिग्रॅम या किंमतीत मिळणार आहेत. या काळात इश्यू प्राइज ३,७३८  रुपये प्रतिग्रॅम असणार आहेत.
या बाँडमध्ये गुतंवणूक करायची असल्यास एक ग्रॅमपासून म्हणजे ३,७३८  रुपयांपासून याची सुरुवात करता येणार आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची सुरुवात मोदी सरकारने २०१५ मध्ये केली होती. सप्टेंबरमध्ये या गोल्ड बाँडची किंमत ३,८९०  रुपये प्रति ग्रॅम होती. मात्र, सोन्याचे भाव घसरल्याने सरकारने गोल्ड बाँडच्या किंमती कमी केल्या आहेत. या गोल्ड बाँडचे विशेष म्हणजे बाजारमूल्यापेक्षा कमी किंमतीत हे बाँड खरेदी करता येणार आहेत. या योजनेच्या किंमती रिझर्व्ह बँकेकडून ठरवण्यात येतात. या बाँडसाठी गुतंवणूक करण्यासाठी कमीतकमी एक ग्रॅमची मर्यादा आहे. तसेच यावर आयकरातही सूट मिळते. तसेच या योजनेवर बँकेकडूनही कर्ज मिळण्याची सोय आहे.
पोस्ट ऑफीस, बँका, एनएसई, बीएसई आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनकडून या बाँडची विक्री करण्यात येते. सोन्याची प्रत्यक्ष मागणी कमी करून बाँडमध्ये गुतंवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. डिमांड डाफ्ट, चेक किंवा ऑनलाइन पेमेंटद्वारे या बाँडची खरेदी करण्यात येते. या बाँडमध्ये एका व्यक्तीसाठी सोने खरेदीची मर्यादा ५०० ग्रॅमपर्यंत आहे. तर एकत्र हिंदू कुटुंब एक वर्षात ४ किलो मूल्यापर्यंतच्या सोन्याची खरेदी करू शकते. सोन्याच्या किंमती वाढल्यास या बाँडमध्ये गुतवणूक केलेल्यांना फायदा होतो. हे बाँड पेपर किंवा इलेक्ट्रिक फॉरमॅटमध्ये असतात. ज्याप्रमाणे सोने ठेवण्यासाठी लॉकरची गरज असते. त्याप्रमाणे या बाँडसाठी लॉकरची गरज भासत नाही. या बाँडमधून वर्षभरात अडीच टक्के रिटर्न मिळू शकतात. तसेच या बाँडमध्ये कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीची शक्यता नाही. हे बाँड आठ वर्षांनंतर मॅच्युअर होणार आहेत. म्हणजेच यात गुंतवणूक केलेली रक्कम आठ वर्षांनंतर काढता येणार आहे.  Print


News - World | Posted : 2019-10-10


Related Photos