दिव्यांग सोबतच वृद्ध व्यक्तींसाठी मतदानाच्या सुविधा द्याव्यात : विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
  निवडणूक आयोग दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे म्हणून काही सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. दिव्यांगसोबतच ८० पेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध मतदारांना, आणि गर्भवती, बाळंत महिलांना सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात, याव्यात असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागीय आयुक्तांनी तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा  निवडणूक संदर्भात तयारीचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, भंडारा उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, नियोजन अधिकारी मृणालीनी भूत, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे आणि उपायुक्त उपस्थित होते.
जिल्ह्यात ४७४४ दिव्यांग मतदार होते. मात्र प्रत्येक  ग्रामपंचयतीने  दिलेल्या माहिती नुसार सध्या ही संख्या वाढून ५२६६ झालेली आहे.  तसेच यांच्याव्यतिरिक्त प्रत्येक गावात ७० ते ८० आणि ८० पेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्ध मतदारांना मतदान केंद्र अधिकारी आणि अंगणवाडी यांनी भेट घ्यावी आणि त्यांना कोणत्या मदतीची गरज आहे याची माहिती संकलित करावी. याचा उपयोग मतदानाच्या दिवशी त्यांना व्हीलचेअर, मदतनीस किंवा गाडी यापैकी कोणती सुविधा द्यायची याचे नियोजन करणे सोपे होईल. त्याचबरोबर गावातील गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांची सुद्धा माहिती काढून त्यांची गरज  नोंदवून घ्यावी. यावर संवेदनशीलपणे काम करण्याच्या सूचना  संजीव कुमार यांनी दिल्यात. 
ज्या केंद्रावर मतदान लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाले होते, त्याचा अभ्यास करून त्याची कारणे शोधून ते दूर करण्यासाठी काम करावे. तरच मतदान जनजागृती अर्थपूर्ण होईल. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आई वडिलांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन करा.
मतदान यादीत महत्वाच्या आणि प्रभावशाली व्यक्तींसोबतच ज्यांनी अर्ज दिला आहे त्यांचेही नाव आले का याची खात्री करून घ्यावी . जेणेकरून मतदानाच्या दिवशी मतदान यादीत नाव नसल्यामुळे मतदान करता आले नाही, अशा तक्रारी कमी होतील. मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी  यादी आताच उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.   Print


News - Bhandara | Posted : 2019-10-09


Related Photos