चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करणार असल्याने प्रशासनाने नदीकाठावरील गावकऱ्यांना दिला सर्तकतेचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
वैनगंगा नदीवर, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यामधील चिचडोह बॅरजचे मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांनी मंजूर केलेल्या द्वार संचलन कार्यक्रमानुसार बॅरेजचे 15.00 मीटर लांबीचे व 9.00 मी. उंचीचे 38 पोलादी दरवाजे बंद करुन पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे.
त्याकरिता 15 ऑक्टोबर 2019 पासून सर्व दरवाजे द्वार संचलन कार्यक्रमानुसार (प्रथम नदी काठावरील व क्रमाक्रमाने मध्यभागातील द्वार) क्रमाक्रमाने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदी पात्रात उर्ध्व बाजुस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे. आणि नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाढलेल्या पाणीसाठयामुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून सर्व लगतच्या गावांना / ग्रामपंचायतींना सुचना देण्यात येते की, त्यांनी आपल्या गावकऱ्यांना, याबाबत दवंडी द्वारे सुचित करावे व नदी काठावर जाणे टाळण्याच्या तसेच नदीकाठावरील शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात. या कार्यालयाकडून ज्या शेतांचे भुसंपादन / सरळ खरेदी करण्यात आलेली आहे व येत आहे. त्या सर्व भुधारकांनी शेतातील कामे करतांना खबरदारी घ्यावी किंवा या कार्यालयाने बुडीत क्षेत्रासाठी संपादीत केलेल्या शेतांमध्ये शेतींची कोणतीही कामे करु नयेत. सर्व मासेमारी करणारे व पशुमालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये. रेती घाटातून रेती काढणारे आणि नदी पात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. अन्यथा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
चिचडोह बॅरेजचे क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधीत होणाऱ्या व नदीकाठावर चामोर्शी, कुरुड, रामपुर, विसापूर, निमगांव, खोर्दा, हिवरगांव, तळोधी, मोकासा, कुनघाडा नवेगांव (रै.), आमगांव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगांव, फराडा, व दोटकुली, डोंगरगाव (बु.),शिवणी,मुडझा(बु.), पुलखल, हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गांडली, वढोली चक, पेटगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.),लोंढोली, उसेगांव, कापसी व उपरी हे गावे असून यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-09


Related Photos