महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू : २६ एप्रिल ला होणार मतदान


- लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले
- आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी

-  सोशल मिडिया व फेक न्यूजवर करडी नजर
-  भूमिपूजन उद्घाटनावर प्रतिबंध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून वर्धा लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू  झाली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात म्हणजे २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. देशभरात ४ जून २०२४ रोजी एकाच दिवशी मतमोजणी होईल. लोकशाहीचा उत्सव असलेली ही निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

८-वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुक जाहिर झाल्याच्या अनुषंगाने १६ मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कर्डिले बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अनील गावीत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची घोषणा केली असून आजपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाने वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासंबंधिची अधिसूचना जारी करण्यात आली असून आदर्श आचारसंहितेची माहिती सुध्दा निवडणूक आयोगाने दिली आहे.  सोशल मिडिया, पेड न्यूज व फेक न्यूजवर आयोगाची व जिल्हा प्रशासनाची करडी नजर असणार असून फेक न्यूज पसरविणाऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल कडक कारवाई करेल. नागरिकांनी सोशल मिडियावर व्यक्त होतांना काळजी घ्यावी तसेच चुकीचे मेसेज पोस्ट करु नये किंवा फॉरवर्ड करु नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

वर्धा लोकसभा मतदार संघात वर्धा जिल्ह्यातील ४४ आर्वी, ४५ देवळी, ४६ हिंगणघाट, ४७ वर्धा व अमरावती जिल्ह्यातील ३६ धामणगाव, ४३ मोर्शी असे ६ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १० लाख ८९ हजार ७१८ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ५४ हजार ४५३ असून स्त्री मतदार ५ लाख ३५ हजार २५५ आहेत व इतर १० मतदार आहेत. जिल्ह्यात उपलब्ध असलेले EVM-VVPAT (FLC OK) मशिन्सची संख्या- CU-१७७२, BU-३२४२, VVPAT-१८८२ आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रांची संख्या १९९७ आहे. या निवडणुकीत जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपक्रम राबवून मतदान जनजागृतीद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत अवैध रक्कम, दारु, प्रतिबंधीत औषधे, नशिले पदार्थांच्या वाहतुकी संदर्भात होणाऱ्या जप्तीबाबत Election Seisure Management System (ESMS) प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली असून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोस्टल बॅलेट मतदान सुविधेसाठी ८५ वर्षावरील नागरिक तसेच दिव्यांगासाठी त्यांच्याकडून फॉर्म नं-१२ डी नमूना बीएलओ मार्फत भरुन घेण्यात येणार आहे. निवडणुक कालावधीत प्रसारमाध्यमांनी पेड न्यूज बाबत आयोगाच्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदान हा एक उत्सव आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

निवडणूक कार्यक्रम : अधिसूचना जारी करणे २८ मार्च २०२४, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख ४ एप्रिल २०२४, अर्जाची छाननी ५ एप्रिल २०२४, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारिख ८ एप्रिल २०२४, मतदानाची तारिख २६ एप्रिल २०२४, मतमोजणीची तारिख ४ जून २०२४, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारिख ६ जून २०२४.





  Print






News - Wardha




Related Photos