दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका नक्षलवाद्याला केले ठार, कारवाईपूर्वी एका जवानाचे हृदयविकाराने निधन


वृत्तसंस्था /  दंतेवाडा : छत्तीसगड राज्यातील   दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील काटेकल्याण जंगल परिसरामध्ये  मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका नक्षलवाद्याला ठार केले. या वेळी जिल्हा राखीव दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला, तर कारवाईपूर्वी एका जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अशी माहिती पोलीस विभागाने दिली.  
सुरक्षा दलाची दोन स्वतंत्र पथके नक्षलवादविरोधी कारवाई करीत असताना पितेपाल गावाजवळ सकाळी नऊ वाजता ही चकमक उडाली. दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील काटेकल्याण जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर माओवादी असल्याची खबर मिळाल्याने सुरक्षा दलाच्या जवळपास ४०० जवानांना तेथे पाठविण्यात आले. या नक्षलवाद्यांची मोठा हल्ला करण्याची योजना होती.
एक पथक पितेपाल गावातील जंगलास वेढा घालत असताना दोन्ही बाजूंनी गोळीबारास सुरुवात झाली. मात्र नक्षलवादी लवकरच घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळी शोध घेतला असता एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाला. त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन मॅगझीन्स हस्तगत करण्यात आले. या चकमकीत जिल्हा राखीव दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला, तर कारवाईपूर्वी राखीव दलाचा साहाय्यक कॉन्स्टेबल कैलास नेताम याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे पलिसांनी सांगितले. ठार झालेल्या नक्षलवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही.   Print


News - World | Posted : 2019-10-09


Related Photos