महत्वाच्या बातम्या

 पुस्तकातून माणूस समृद्ध व प्रगल्भ : ज्येष्ठ साहित्यिक वि.स. जोग


- दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पुस्तकांमध्ये अफाट ज्ञान आहे. वाचनामुळे हे ज्ञान माणसाला आत्मसात होत असते. ज्ञानामुळे माणूस समृद्ध, प्रगल्भ होतो. त्यामुळे प्रत्येकाने चांगली पुस्तके सातत्याने वाचली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वि.स. जोग यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने नागपूर ग्रंथोत्सव- २०२३ चे आयोजन १५ ते १६ मार्च कालावधीत वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, संविधान चौक येथे करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जोग बोलत होते. यावेळी वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. मनोहर कुंभारे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, ग्रंथपाल (वर्ग १) मिनाक्षी कांबळे, विदर्भ ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार उपस्थित होते.

गंथ्रोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि.स. जोग यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते. दुपारी २ वाजता पहिल्या सत्रात साहित्य अभिवाचन तर दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वाजता देहदान व अवयवदान : काळाजी गरज या विषयावर झाले. तिसऱ्या सत्रात दुपारी ४.३० वाजता एकपात्री प्रयोग सादर करण्यात आले.

जोग पुढे म्हणाले की, वाचन माणसाला समृध्द तर करतेच शिवाय काय चांगले, काय वाईट याची समजही वाचनातून प्राप्त होत असते. संवेदनशीलता आणि आत्मविश्वास देखील वाचनातून प्राप्त होतो. कोणत्याही व्यक्तीला यशप्राप्तीसाठी पुस्तकांचा फार मोठा फायदा होतो. लहान वयापासून लागलेली वाचनाची आवड पुढे त्या त्या व्यक्तीला आपले आयुष्य यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देते, असे पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले. ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करतांना यशाचे शिखर गाठण्यासाठी वेगवेगळी पुस्तके वाचने फार आवश्यक आहे. परिक्षेची तयारी करतांना अवांतर वाचन देखील उपयुक्त ठरत असल्याचे जोग म्हणाले.

पूर्वीपासूनच आपला सांस्कृतिक वारसा लिखित साहित्याच्या वाचनातून जतन करत आलो आहोत. जगात जर कोणती संस्कृती श्रेष्ठ असेल तर ती म्हणजे वाचन संस्कृती. वाचन संस्कृतीची नाळ प्रत्येक माणसाशी प्राचीन काळापासून जोडली गेली आहे.ही वाचन संस्कृती आजच्या मोबाईलच्या युगात वाचविण्याची गरज आहे. पुढच्या पिढ्यांनाही वाचनाशिवाय तरणोपाय नसल्याचा आशावाद दाते यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान उद्या १६ मार्चला सकाळी ११ वाजता कवीसंमेलन विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. दुपारी २ वाजता ग्रंथानी मला घडविले या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता किशोर व किशोरींना मराठी वाचनाची गोडी लागावी याकरिता : ग्रंथालयाची भूमिका या विषयावर चर्चा सत्र होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos