शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे महालात निघाली जिजाऊ पराक्रमी दौड


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  / नागपूर : 
महिलांचा आत्मविश्वास आणि सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनीच पुढे येण्याची गरज आहे. जोवर महिला या स्वत:च्या प्रगतीसाठी पुढाकार घेणार नाही, तोवर तिची उन्नती होऊ शकत नाही. महिलांमधील सुप्त गुणंना वाव मिळावा या हेतूने शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे जिजाऊ पराक्रमी दौडचे आयोजन करण्यात आले होते.
समितीतर्फे दरवर्षी ही दौड आयोजित करण्यात येते. यंदा दौडचे पाचवे वर्ष आहे. महालातील शिवतीर्थ येथून ही दौड सुरू झाली. नवरात्रोत्सवातील अष्टमीच्या दिवशी दौड काढण्यात येते. आदिशक्ती देवी जागर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची गाणी गात दौडचा शुभारंभ झाला. टिळक पुतळा, थडेश्वर राम मंदिर असा प्रवास करत दौड आग्याराम देवी मंदिरात पोहचली. मंदिरात आरतीने दौडचा समारोप झाला. दौडचे नेतृत्व महिलांनी केले. हातात भगवा ध्वज, मुखी देवीची नाव स्मरत सुरू झालेल्या दौडच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी महिलांना संबोधित करताना दिलीप दिवटे म्हणाले,'महिला विविध क्षेत्रामध्ये अग्रसर आहेत. स्वत:च्या ताकदीने अनेक क्षेत्र गाजवित आहेत. पण अद्यापही त्यांच्यावरील अन्याय, अत्याचारात घट झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांच्याकडून प्रेरणा घेत महाराष्ट्र घडविला. तीच प्रेरणा आजही कायम रहावी आणि महिलांचा आदर करणारा राष्ट्र निर्माण व्हायला हवा. प्रत्येक आपले मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार असणारे सुशासन असायला हवे.' घराघरात जिजाऊ घडविण्याचा निर्धार दौडमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी केला.
यावेळी प्रतिभा जगनाडे, नीरजा पाटील, दीप्ती घाटोडे, कल्पना सुर्वे, शारदा गावंडे, दत्ता शिर्के, विवेक पोहाने, प्रवीण घरजाळे, विवेक सूर्यवंशी, रमेश सुर्वे, लक्ष डोले, विशाल निरगुडे, दीपक मौंदेकर, सुमित भोयर, चेतन बावनकुळे, सुधांशू ठाकुर, साहिल काथोटे, आशिष चौधरी आदी उपस्थित होते.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-10-07


Related Photos