भारतीयत्व आणि हिंदूत्व जागृतीसाठी संघस्थापना : डॉ. शार्दुल वरगंटीवार


- रा. स्व. संघाचा  चंद्रपूर नगराचा विजयादशमी उत्सव थाटात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी  / चंद्रपूर : 
आपत्तीच्या काळात रा. स्व. संघाचे स्वयंसेवक धावून जातात, राष्ट्रकार्यासाठी तन, मन व धनाने मदत करतात, तेव्हा त्यांची भूमिका अगदी वाखाणण्याजोगी असते. संघाची शाखा मी अगदी लहानपणापासून बघतो आहे. तेव्हा संघाची निर्मिती का झाली, असा प्रश्न माझ्यापुढे असायचा. पुढे जेव्हा जाणून घेतले तेव्हा असे लक्षात आले, संघस्थापना केवळ आणि केवळ भारतीयत्व आणि हिंदूत्व जागृतीसाठी झाली आहे, जे राष्ट्राच्या कल्याणासाठी अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन येथील प्रतिथयश न्युरो सर्जन डॉ. शार्दुल वरगंटीवार यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर नगरचा विजयादशमी उत्सव रविवार ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शार्दुल वरगंटीवार, तर प्रमुख वक्ते म्हणून संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत महामंत्री आशुतोष अडोणी तसेच जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, नगर संघचालक विधीज्ज्ञ रवींद्र भागवत प्रभृती व्यासपीठावर उपस्थित होते.
आशुतोष अडोणी यांनी, संघस्थापनेची गरज विविध उदाहरणांनी विशद केली. संघ स्थापनेचा इतिहास बघताना, संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जीवनपटलाचाही अभ्यास आवश्यक आहे. जेव्हा स्वातंंत्र्यासाठी दोन प्रवाह प्रचलित होते, डॉ. हेडगेवारांनी ते अतिशय जवळून बघितले, अनुभवले होते, तेव्हा त्यांच्या मनात एक मुलभूत मंथन सुरू होते. हे राष्ट्र पारतंत्र्यात का गेले, हा प्रश्न या मंंथनास कारणीभूत होता. खरे तर,  पारतंत्र्यासाठी कोण जबाबदार आहे. दुसरा तिसरा कुणीच नाही, आम्हीच त्यास जबाबदार आहोत. कारण आपला हिंदू समाज असंघटित होता. प्रांता-प्रांतात, जाती-धर्मात विघटित झाला होता आणि हेच एकमेव कारण आपल्या पारतंत्र्याचे होते. हे राष्ट्र पुनरपी घडवायचे असेल, तर या राष्ट्राचा कारक असलेल्या हिंदू समाजाचे संघटन केले पाहिजे, असा विचार प्रकर्षाने डॉ. हेडगेवारांच्या मनात आला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.
हिंदू समाज हा राष्ट्रीय समाज म्हणून उभा झाला, तर परमवैभवाचा मार्ग मोकळा होईल, हे डॉ. हेडगेवार यांनी ओळखले होते. त्यासाठी या समाजाला एकजूट करण्याची गरज होती. संघाच्या हिंदूत्वाला उपासनपध्दती बंधनकारक नाही. जो या राष्ट्राला आपला मानतो, तो हिंदू आहे. हाच हिंदूत्वाचा व्यापक विचार घेऊन आज संघ उभा आहे, असेही अडोणी म्हणाले.
तत्पूर्वी, अ‍ॅड. रवींद्र भागवत यांनी प्रास्ताविक, परिचय, स्वागत आणि आभार मानले. ते म्हणाले,  संस्कारक्षम नागरिक घडणार नाही, तोपर्यंत मिळालेल्या स्वांतत्र्याचा काहीही उपयोग होणार नाही. या विचारातून डॉ. हेडगेवार यांनी १९२५ रोजी लहान मुलांना सोबत घेऊन विजयदशमीला संघाची सुरूवात केली. तेव्हा याचा उपहास केला गेला. मात्र, संघ मोठा झाला. तेव्हा विरोधही होऊ लागला. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जागतील सर्वात मोठे स्वयंसेवी संघटन बनले आहे. समाजातील सर्वांना सोबत घेऊन राष्ट्राला परमवैभवावर नेणे हे संघाचे मुख्य उद्दीष्ट्य आहे. यासाठी समाजातील माणसांना जोडून संस्कारित करण्याचे कार्य संघ निरंतर करीत आहे. सांघिक गीत, स्वयंसेवकांचे शारीरिक प्रात्यक्षिके, सामुहिक समता, सुर्यनमस्कार, योगासन, सामुहिक व्यायाम योग तसेच सुभाषित, अमृतवचन व वैयक्तीक गीत झाले. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-07


Related Photos