प्लास्टीकमुक्तीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात महाश्रमदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
 स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये प्लास्टीकमुक्तीसाठी नुकताच महाश्रमदानाचा कार्यक्रम पार पडला. अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छता व दवाखान्यातील प्लास्टीक महाश्रमदानातून गोळा केला. या पुढे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये प्लास्टीकला हद्दपार करण्यासाठी पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर  करण्यात येणार आहे.
स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये प्लास्टीकमुक्तीसाठी महाश्रमदान करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके यांच्या नेतृत्वात सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत प्लास्टीकमुक्तीसाठी महाश्रमदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दवाखाने प्लास्टीकमुक्त करण्यासाठी महाश्रमदानाचा कार्यक्रम राबविला. दावाखान्याची अंतर्गत व परिसर स्वच्छता करुन दवाखान्यामध्ये असलेला प्लास्टीकचा कचरा गोळा करण्यात आला. हा सर्व कचरा संकलीत करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.  जिल्हयातील बहुतांश दवाखाने आयएसओ झालेले असून या दवाखान्यातून जनावरांची निगा राखण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. परंतु उघडयावर पडून असलेले प्लास्टीक जनावरांसाठी धोकादायक ठरलेले आहेत. त्यामुळे सर्व प्रथम दवाखाने प्लास्टीक मुक्त करण्यासाठी जिल्हयाच्या पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला व दवाखान्यातील प्लास्टीक गोळा करुन यापुढे प्लास्टीकचा वापर न करण्याचा संकल्प करण्यात आला. 
जनावरांच्या जीवनदानासाठी प्लास्टीकला हद्दपार करा
ठिकठिकाणी प्लास्टीकचा कचरा पडून राहत आहे. त्या प्लास्टीकमध्ये अन्न तर कधी ओला कचरा साठवून फेकण्यात येत असल्याने जनावरे ती प्लास्टीक  खातात. त्यामुळे ती प्लास्टीक जनावरांच्या पोटात गोळा होते. कालांतराने त्या प्लास्टीकचे दुष्परिणाम जनावरांना भोगावे लागतात. जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. तर कधी मृत्युही ओढावतो. त्यामुळे प्लास्टीक मानव व प्राण्यांसाठीही धोकादायक ठरली आहे. पर्यावरणावरही प्लास्टीकचे दुष्परिणाम ओढावले आहे. जनावरांना जीवनदान देण्यासाठी प्रत्येकांनी प्लास्टीक ऐवजी कापडी पिशव्या किंवा पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. फुके यांनी केले आहे.   Print


News - Bhandara | Posted : 2019-10-07


Related Photos